मुंब्रा-कळव्याला 55 कोटींचा विशेष निधी, ‘राष्ट्रवादी’च्या माजी नगरसेवकांनी मानले ‘शिवसेने’चे आभार

मुंब्रा-कळव्याला 55 कोटींचा विशेष निधी, ‘राष्ट्रवादी’च्या माजी नगरसेवकांनी मानले ‘शिवसेने’चे आभार
Published on
Updated on

ठाणे, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सत्तासंघर्षाची ठिणगी पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्यादृष्टीने मुंब्रा-कळवा मतदारसंघात आव्हाड यांना रोखून धरण्यासाठी शिवसेनेने रणनीतीनुसार डाव टाकण्यास सुरुवात केली आहे. अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न झाल्यानंतर आता खासदार डॉ. शिंदे यांनी कळवा आणि मुंब्रा परिसराच्या विकासासाठी 55 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करून घेतला. हा निधी मिळाल्याने राष्ट्रवादी, एमआयएमच्या माजी नगरसेवकांनी खासदार शिंदे यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानल्याचे ट्विट शिवसेनेने केल्यानंतर राजकीय चर्चाना उधाण आले आहे.

राष्ट्रवादीचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड हे कळवा-मुंब्रा विधानसभेचे गेल्या 15 वर्षांपासून प्रतिनिधीत्व करतात. या भागातून राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक ठाणे महापालिकेत निवडून येतात. हा परिसर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र व खासदार श्राकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदार संघामध्ये कळवा-मुंब्रा विधानसभा मतदार संघ येतो. त्यात आमदार आव्हाड आणि खासदार शिंदे यांच्यात विळा-भोपळ्याचे नाते आहे. यामुळेच राज्यातील सत्ताबदलानंतर खासदार शिंदे यांनी कळवा-मुंब्रा भागावर लक्ष केंद्रीत केले आणि शिंदे -आव्हाड वाद पेटला.

मिशन मुंब्रा कळवा हाती घेऊन शिवसेनेने राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केले. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राजण किणे यांना बळ देऊन त्यांच्या नेतृत्वाखाली मुंब्य्रातील काही माजी नगरसेवकांची आघाडी स्थापन करून राष्ट्रवादीला शह देण्याची रणनीती काम करीत असल्याची चर्चा रंगलेली आहे. लवकरच ठाणे महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता असताना कळवा आणि मुंब्रा परिसराच्या विकासासाठी खासदार डॉ. शिंदे यांनी 55 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करून घेतला. हा निधी मिळवून दिल्याबद्दल राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राजन किणे, अनिता किणे, मोरेश्वर किणे, साजिया अन्सारी यांचे दिर राजू अन्सारी, एमआयएमचे माजी नगरसेवक आजमी शाह आलम शाहिद यांनी खासदार डॉ. शिंदे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे आभार मानले. तसे ट्विट शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी करून लक्ष्य कळवा-मुंब्रा विकासाचे असे म्हणत आव्हाडांना डिवचले. कळवा विशेष करून मुंब्रा विभागातील सर्व पक्षीय नगरसेवकांनी पक्षीय बंध झुगारून वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन डॉ. शिंदे यांचे आभार मानून सत्कार केल्याचे म्हटले आहे.

कल्याण लोकसभेचे गेली 9 वर्षे खासदार असलेल्या श्रीकांत शिंदे यांना कळवा-मुंब्रा परिसराच्या विकासाची आता आठवण झाली, हे दुदैव आहे. गेली दहा महिने एमएमआरडीए निधी राजकीय पद्धतीने वापरला जातोय. विरोधी पक्षातील आमदारांच्या मतदार संघात हा निधी दिला जात आहे. पण, त्यातून नागरिकांची कामे होणार असतील तर ही चांगली बाब आहे. ठाणे महापालिकेत सत्ता असताना कळवा मुंब्र्याला निधी मिळू नये, तेथील प्रकल्पांची चौकशी लावण्यासाठी अग्रेसर असलेल्यांना आता विकासाची आठवण झाली.

आनंद परांजपे (अध्यक्ष-राष्ट्रवादी काँग्रेस, ठाणे)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news