

पुढारी ऑनलाईन डेस्क: देशातील ज्या जिल्ह्यांमध्ये नवोदय विद्यालये नाहीत, त्या २८ जिह्यांमध्ये नवोदय विद्यालये स्थापन करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. याचा प्रारंभ महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात नवोदय विद्यालय सुरू करून करण्यात येणार आहे. या संदर्भातील माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.७) त्यांच्या एक्स अकाऊंटवरून दिली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय मंत्रिमंडळाने नवोदय विद्यालय योजना विस्तारासाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये नवोदय विद्यालये नाहीत, अशा 28 जिल्ह्यांमध्ये ही विद्यालये स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली असून यासाठी एकूण अंदाजे ₹2359.82 कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्याचाही समावेश करण्यात आला आहे. देशाच्या शिक्षण क्षेत्रातील हे क्रांतिकारक पाऊल असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.
नवोदय विद्यालयातील एका प्रकल्पांतर्गत एकूण ५६० विद्यार्थी क्षमता असणार आहे. त्यामुळे 560*28=15680 विद्यार्थ्यांना या विद्यालयांचा लाभ घेता येणार आहे. एक पूर्ण विद्यालय चालवण्यासाठी समितीने निश्चित केलेल्या निकषांच्या बरोबरोने पदे देखील निर्माण केली जातील, असे देखील केंद्रीय आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने माहिती दिली आहे.