मुंबई : पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिघांनी लैंगिक अत्याचार केला. त्यात तिच्या सतरा वर्षांच्या अल्पवयीन प्रियकरासह त्याच्या दोन मित्रांचा समावेश आहे. या तिघांविरुद्ध लैंगिक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अल्पवयीन प्रियकराला डोंगरी सुधारगृहात पाठविण्यात आले तर इतर दोघांना विशेष सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.
पीडित मुलगी ही घोडपदेव परिसरात राहत असून तिची मे महिन्यांत सोशल मिडीयावर एका सतरा वर्षांच्या मुलाशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले व नंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. याच दरम्यान त्याने तिला भेटायला बोलाविले. तिथे त्याला भेटण्यासाठी गेल्यानंतर त्याने
तिला एका निवासी अपार्टमेंटच्या अकराव्या मजल्यावर नेले. तिथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिचे काही अश्लील फोटो काढले. या फोटोवरुन त्याने तिच्यावर दोन ते तीन वेळा लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्याने त्याच्या दोन मित्रांना ते फोटो पाठविले. या फोटोवरुन या दोघांनी ब्लॅकमेल करुन तिला शारीरिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त केले. तिने तसे केले नाही तर तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. अशा प्रकारे तिच्या अल्पवयीन प्रियकरासह इतर दोन मित्रांनी तिच्यावर मे ते जुलै महिन्यांत लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार अलीकडेच मुलीकडून तिच्या आईला समजला. त्यानंतर तिने तिन्ही आरोर्पीविरुद्ध भायखळा पोलिसांत तक्रार केली. या तक्रारीनंतर तिन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला.