अब्दुल सत्तार यांनी घेतली मंत्री दानवे यांची भेट | पुढारी

अब्दुल सत्तार यांनी घेतली मंत्री दानवे यांची भेट

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना नेते, राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी बुधवारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

मतदारसंघातील विकासकामांसंबंधी मंत्री दानवे यांच्यासोबत चर्चा केली. तसेच जळगाव-सोलापूर रेल्वे सुरू करावी, अशी विनंती केली आहे. औरंगाबाद तसेच जालना जिल्ह्यांतील रेल्वेच्या प्रलंबित प्रश्‍नांसंबंधी भेटीदरम्यान चर्चा केल्याची माहिती सत्तार यांनी दिली. सत्तार गेल्या दोन दिवसांपासून दिल्ली दौर्‍यावर आहेत. यादरम्यान त्यांनी मंगळवारी केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. भेटीनंतर भाजप-शिवसेना युतीचा पूल केवळ मंत्री गडकरी हेच बांधू शकतात, असे वक्‍तव्य सत्तारांनी केले होते. त्यानंतर लगेच त्यांनी दानवे यांची भेट घेतली आहे.

दरम्यान, नितीन गडकरी यांना खूश करण्यासाठी सत्तार यांनी भाजप-शिवसेना युतीसंबंधी वक्‍तव्य केले असेल, असा उपरोधिक टोला दानवे यांनी लगावला. त्यांच्या विधानाला फार गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नसल्याचेदेखील ते म्हणाले.

युतीसंबंधी सत्तार यांच्याकडून केलेल्या वक्‍तव्यावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी टीका केली होती. त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत, सर्व विषयांवर बोलण्याचा अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. माझे वक्‍तव्य वैयक्‍तिक आहे. माध्यमांनी विचारले म्हणून मी उत्तर दिले, असे अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले.

Back to top button