नवी दिल्ली/मुंबई : पुढारी वृत्तसेवा : देशभरात सोमवारपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला उत्साहात प्रारंभ झाला. या वयोगटातील मुलांनी नोंदणी आणि प्रत्यक्ष लसीकरणासाठीही मोठा प्रतिसाद दिल्याने पहिल्याच दिवशी 40 लाखांवर मुले लसवंत झाली. शनिवारी कोविन पोर्टलवर नोंदणी सुरू झाली. सोमवारपर्यंत 50 लाखांवर मुलांनी नोंदणी केली. लसीकरण आणि नोंदणीचा पहिल्याच दिवशी विक्रम नोंदवला गेला. महाराष्ट्रातही पहिल्याच दिवशी 1 लाख 79 हजार 52 मुलांना कोरोनाची लस देण्यात आली. येत्या 20 जानेवारीपर्यंत लसीकरण कार्यक्रम पूर्ण करण्यात येणार आहे.
सोमवारी रात्री 8 वाजेपर्यंत कोविन डॅशबोर्डवरील आकडेवारीनुसार, 40 लाख 2 हजार 782 मुलांना लस देण्यात आली, तर 51 लाख 52 हजार 901 जणांनी नोंदणी केली आहे. महाराष्ट्रातील 1 लाख 79 हजार 52 मुलांनी लस घेतली.
कोरोना संसर्गाचा वाढता धोका आणि ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग, या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 डिसेंबरला 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची घोषणा केली होती. प्रत्यक्ष नोंदणी 1 जानेवारीपासून सुरू झाली आणि सोमवारपासून देशभरात लसीकरणही सुरू करण्यात आले.
सोमवारी दुपारपर्यंत जवळपास 13 लाख मुलांनी डोस घेतला. कोविन पोर्टलवर नोंदणी करण्यासह थेट केंद्रावर जाऊनही मुले लस घेतानाचे चित्र दिसत होते. लसीकरणासाठी केंद्राकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीचे अतिरिक्त डोस पाठवले आहेत. मुलांच्या लसीकरणासह आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स तसेच वरिष्ठ नागरिकांसाठी 10 जानेवारीपासून प्रिकॉशन डोस देण्यात येणार आहे.
मुंबई : महाराष्ट्रात 15 ते 18 वयोगटातील म्हणजेच इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या 65 लाख 23 हजार 911 इतकी आहे. सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचे नियोजन केल्याची माहिती शिक्षण विभागाने सोमवारी दिली.
दहावी, बारावीच्या आगामी परीक्षा लक्षात घेऊन 15 ते 20 जानेवारीपर्यंत या विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य शालेय शिक्षण विभागासमोर आहे. त्यासंबंधीच्या नियोजनाचा आढावा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला. शिक्षण विभागातील सर्व अधिकार्यांची ऑनलाईन बैठक सोमवारी झाली. त्यावेळी 100 टक्के विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याच्या सूचना शिक्षणमंत्र्यांनी दिल्या.
विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबत शालेय शिक्षण विभाग दक्ष असून, कोरोना प्रतिबंधक लसीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे या आढावा बैठकीत स्पष्ट करण्यात आले. शालेय शिक्षण सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
मुंबईत उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबईत 15 ते 18 वयोगटातील 9 लाख मुले आहेत. दिवसाला तीन हजार मुलांना डोस देण्याचे उद्दिष्ट असताना उत्स्फूर्त प्रतिसादामुळे सोमवारी एकूण 6115 मुलांना लस देण्यात आल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर तब्बल 4806. तर राज्य शासनाच्या लसीकरण केंद्रांवर 148 तर खासगी रुग्णालयांत 1161 मुलांना पहिला डोस देण्यात आला.
केंद्राची नवी नियमावली
कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचारी येतील. बाकी वर्क फ्रॉम होम करतील, असा नियम केंद्राने सोमवारी जारी केला. कन्टेन्मेंट झोनमध्ये राहणार्या कर्मचार्यांना तसेच गर्भवतींना कार्यालयात बोलावू नका, असे आदेशही देण्यात आले आहेत.