भिवंडी ; पुढारी वृत्तसेवा : भिवंडी तालुक्यातील चिंबीपाडा येथील शासकीय आश्रमशाळेतील 14 मुली 4 मुलांसह अधीक्षक व स्वयंपाकी अशा एकूण 20 जणांना कोरोनाची लागण झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पाल्यांच्या पालकांनी आश्रमशाळेत गोंधळ घालीत बाधित विद्यार्थ्यांना घेऊन घरी पळ काढला.
सकाळी काही विद्यार्थिनींना खोकला व ताप जाणवू लागल्याने शाळेचे मुख्याध्यापक रवी चौधरी यांनी नजीकच असलेल्या चिंबीपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ दत्तात्रय धारणे यांना या बाबत कळविले. डॉ दत्तात्रय धारणे हे आपल्या वैद्यकीय पथकासह आश्रमशाळेत दाखल होत तेथील विद्यार्थ्यांची अँटीजेन चाचणी करण्यास सुरवात केली असता त्यामध्ये 14 मुली, 4 मुले, अधीक्षक व स्वयंपाकी असे एकूण 20 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
सध्या 470 विद्यार्थी वसतिगृहात राहत आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या वाढण्याची भीती लक्षात घेता सर्व विद्यार्थ्यांची अँटीजेन चाचणी घेण्यास सुरुवात केली आहे. यात आणखी बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. समाधानाची बाब म्हणजे हे सर्व रुग्ण सौम्य लक्षण असलेली आहेत अशी माहिती डॉ. धारणे यांनी दिली आहे.