vijay wadettiwar : तर राज्यात लॉकडाऊन लागणार, विजय वडेट्टीवार यांचा इशारा | पुढारी

vijay wadettiwar : तर राज्यात लॉकडाऊन लागणार, विजय वडेट्टीवार यांचा इशारा

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : देशासह राज्यात मागच्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णामध्ये वाढ होताना दिसत आहे. राज्य सरकारने खबरदारी म्हणून रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत निर्बंध लावले आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही काही मार्गदर्शक सुचना केल्या आहेत. (vijay wadettiwar)

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील कोरोना स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ झाल्यास लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय असणार नाही असे वक्तव्य केले आहे.

राज्यातील कोरोना स्थितीवर वेळीच नियंत्रण मिळवले नाही तर जानेवारी आणि एप्रिलमध्ये विस्फोटक परिस्थिती निर्माण होईल, असा इशारा ही मंत्री वडेट्टीवार यांनी दिला आहे.

राज्यातील लोकांनी सर्व नियम पायदळी तुडवले तर लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही, असेही ते म्हणाले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

vijay wadettiwar : वेळीच नियंत्रण मिळवले नाही तर

महाराष्ट्रात जानेवारी आणि एप्रिलमध्ये करोनाची विस्फोटक परिस्थिती निर्माण होईल. कोरोना वेगाने पसरतो आहे. त्यामुळे हे नियंत्रण लोकांच्या हातात आहे. आपण कसं राहायचं, काय नियम पाळावे, काय नियम पाळू नये हे लोकांनी ठरवायचे आहे. लोकांनी जर सर्व नियम पायदळी तुडवले तर लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय दिसत नसल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

असे आहेत नवे निर्बंध

विवाह सोहळ्यांमध्ये उपस्थितांची संख्या ही 50 एवढी मर्यादीत करण्यात आली आहे. लग्न बंद हॉलमध्ये असेल किंवा खुल्या मैदानात असेल तरीही ही मर्यादा कायम राहणार आहे. यापूर्वी बंदिस्त सभागृहांसाठी ही मर्यादा 100 आणि खुल्या जागेसाठी 250 इतकी होती.

त्याशिवाय इतर कोणतेही सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक सोहळे असतील तर त्यासाठीदेखील उपस्थितांच्या संख्येची मर्यादा ही 50 एवढीच मर्यादीत ठेवण्यात आली आहे.

अंत्यसंस्काराच्या सोहळ्यासाठी उपस्थितांच्या संख्येची मर्यादा आणखी कमी करण्यात आली असून अंत्यविधीला केवळ 20 जणांच्या उपस्थितीला परवानगी असणार आहे.

मुंबई कडक निर्बंध

मुंबईतील वाढती रुग्णसंख्या पाहता पोलिसांनी 30 डिसेंबर ते 7 जानेवारीपर्यंत कलम 144 लागू केलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.

नवीन वर्षाचे सेलिब्रेशन, पार्ट्या, सार्वजनिक ठिकाणी सेलिब्रेशनसाठी एकत्र जमण्यावर पोलिसांनी बंदी घातली आहे. 30 डिसेंबर रात्री 12 वाजेपासून ते 7 डिसेंबर रात्री 12 पर्यंत मुंबईत हे आदेश लागू असतील असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

Back to top button