मंत्री, आमदारांसह बडे नेते कोरोनाच्या विळख्यात | पुढारी

मंत्री, आमदारांसह बडे नेते कोरोनाच्या विळख्यात

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राज्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झालेली असतानाच राज्यातील अनेक बड्या नेत्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे समोर येत आहे. मात्र, या नेत्यांना मुंबईत अधिवेशनासाठी एकत्र आल्याने संसर्ग झाला की सध्या सर्वत्र धुमधडाक्यात सुरू असलेल्या लग्नसोहळ्याला उपस्थिती लावत असल्याने कोरोनाची बाधा झाली याची चर्चा सुरू आहे.

आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार सुप्रिया सुळे व त्यांचे पती सदानंद सुळे, भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील, हर्षवर्धन पाटील, आमदार माधुरी मिसाळ आदींना मागील काही दिवसांत कोरोनाची लागण झाली आहे.

मुंबईत नुकतेच हिवाळी अधिवेशन पार पडले. त्यामुळे राज्यभरातून सुमारे साडेतीनशेहून अधिक आमदार आपल्या लवाजम्यासह मुंबईत दाखल झाले होते. तर, दुसरीकडे सध्या अनेक नेत्यांच्या मुला- मुलींची लग्ने प्रचंड गर्दीत सुरू आहेत. अशा विवाह समारंभांना नेतेमंडळी हजेरी लावत आहेत. लग्नसोहळ्यांना हजेरी लावण्याची राजकीय मंडळीच्या ‘लगीनघाई’ने कोरोनाचा राजकीय संसर्ग वाढला आहे. त्यामुळे मास्क न लावता सर्वत्र मिरवलेले मंत्री, आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोना झालेले मंत्री, आमदार हिवाळी अधिवेशनात सहभागी झाले होते. तेव्हापासून विविध खात्यांचे अधिकारी-कर्मचारी कामाच्या निमित्ताने त्यांच्या संपर्कात आले होते. खासगी सचिव, ओएसडी अधिकार्‍यांना तर मंत्र्यांसोबतच थांबावे लागते. मात्र, आता अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर रोज एक-दोन मंत्री, आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत असल्याने संपर्कात आलेल्या अधिकर्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नियम पाळावेत व गर्दी करू नये, असे आवाहन करणार्‍या नेते मंडळींकडून सर्रास नियमांचे उल्लंघन होत असल्याचे लग्न सोहळे व कार्यक्रमांतून दिसत आहे. मुंबईत 28 डिसेंबरला भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीच्या विवाह समारंभात बहुतांशी मंत्र्यांनी, नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी नवदाम्पत्यासोबत ‘फोटोसेशन’ करताना कोणीही मास्क घातल्याचे दिसले नाही. या लग्नाला हजेरी लावलेल्या सुप्रिया सुळे कोरोनाबाधित झाल्या आहेत.

हर्षवर्धन पाटील कोरोनाबाधित झाले आहेत. राहुरीतील माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या मुलाच्या लग्नाला हजेरी लावलेले भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत. यावेळी विखे-पाटील हे विनामास्कच वावरत होते आणि त्यांच्यासमवेत देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, राम शिंदे आदी नेतेही फिरत होते. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे, मंगळवारी विखे – पाटील सभागृहात मास्क न घालताच बसले होते.

Back to top button