नवीन वर्षात दैनंदिन वस्तूंसह रेडीमेड कपडे, चप्पला महागणार | पुढारी

नवीन वर्षात दैनंदिन वस्तूंसह रेडीमेड कपडे, चप्पला महागणार

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : नव्या वर्षात सर्वसामान्यांना महागाईच्या प्रचंड झळा सहन कराव्या लागणार आहेत. कारण दैनंदिन वापरातील वस्तूंसह रेडीमेड कपडे, चप्पल, चारचाकी वाहने आणि असंख्य वस्तूंच्या किंमतीत वाढ केली जाणार आहे. वाढत्या उत्पादन खर्चासह वस्तू व सेवा करात (जीएसटी) वाढीचे कारण पुढे करत नामांकित आणि बड्या कंपन्यांनी वस्तूंच्या किंमती वाढवणार असल्याचे सांगितले आहे.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी म्हणाले की, 1 जानेवारी 2022पासून रेडीमेड कपडे आणि चप्पलांच्या किंमतीत 100 ते 200 रुपयांची वाढ होईल. शासनाकडून मुलभूत गरज म्हणून एक हजार रुपयांहून कमी किंमतीच्या कपडे आणि चप्पलांवर 5 टक्के जीएसटी आकारला जात होता.

याउलट चैनीची वस्तू म्हणून एक हजार रुपयांहून अधिक किंमतीच्या रेडीमेड कपडे आणि चप्पलांवर 12 टक्के जीएसटी आकारला जात आहे. मात्र जीएसटी परिषदेने या कर रचनेत बदल करताना 1 जानेवारी 2022पासून सरसकट सर्व रेडीमेड कपडे आणि चप्पलांवर 12 टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर वाढीव 7 टक्के जीएसटीचा भार पडणार आहे.

इंधन दरवाढ, यार्नच्या किमतीत झालेली वाढ आणि आता जीएसटीमध्ये 5 टक्क्यांवरून थेट 12 टक्क्यांपर्यंत झालेल्या वाढीमुळे रेडीमेड कपड्यांच्या किमती जानेवारीत तब्बल 15 ते 20 टक्क्यांनी भडकणार आहेत. परिणामी, यावर्षी 500 ते 1 हजार रुपयांना मिळणारे रेडीमेड कपडे पुढील वर्षी 600 ते 1 हजार 200 रुपयांना खरेदी करावे लागतील.

चपला किंवा पादत्राणांच्या किमतीतही याचप्रकारे वाढ अपेक्षित आहे. या वाढीव किमतीचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना सहन करावा लागणार आहे. याउलट चपल आणि कपड्यांच्या किमती वाढल्यानंतर खरेदीत आखडता हात घेणार्‍या ग्राहकांमुळे व्यापार्‍यांच्या उलाढालीस उतरती कळा लागणार आहे. परिणामी, ग्राहक वर्गातून रोष व्यक्त होत असताना व्यापारी वर्गानेही केंद्राविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

एफएमसीजी वस्तूंच्या किंमती नव्या वर्षात पहिल्या तिमाहीत 4 ते 10 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्स आणि एअर कंडिशनर्स (एसी) या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किंमती डिसेंबरमध्ये 3 ते 5 टक्क्यांनी वाढल्या असून जानेवारीत आणखी 6 ते 10 टक्क्यांनी वाढणार आहेत.

गेल्यावर्षीच्या तुलनेत पामतेलासह क्रूड ऑईलच्या किंमती महागल्याने, तसेच पॅकेजिंगचे दर वाढल्यामुळे डाबर, हिंदुस्थान युनिलिव्हर, ब्रिटानिया, मारिको आणि इतर महत्त्वाच्या कंपन्यांनी 5 ते 12 टक्क्यांनी वस्तूंच्या किंमतीत वाढ केली आहे. पारले प्रोडक्टस कंपनीकडून येत्या तीन महिन्यांत 4 ते 5 टक्के किंमती वाढवण्यात येणार आहे.

स्टील, कॉपर, प्लास्टिक, अल्युमिनियम यांच्या किंमतीत वाढ झाल्याने दुचाकींसह चारचाकी वाहने महागणार आहेत. वाहन निर्मितीत या धातूंवर होणारा खर्च हा 80 ते 85 टक्क्यांपर्यंत असतो.

हीरो मोटरकॉर्पने 4 जानेवारीपासून वाहनांच्या किंमतीत 2 हजार रुपयांची वाढ घोषित केली आहे. मारुती सुझुकीनेही नव्या वर्षात किंमती वाढवणार असल्याचे म्हटले आहे.

भुर्दंड ग्राहकांनाच

कापड विक्रीवर वाढवलेला जीएसटीचा आर्थिक भुर्दंड हा ग्राहकांनाच सहन करावा लागणार आहे. मोठ्या मॉल्ससह बड्या शोरूममध्ये एक हजारांहून अधिक किंमतीचे रेडीमेड कपडे विकले जातात. त्यामुळे त्यांच्याकडून या निर्णयास विरोध होताना दिसत नाही. याउलट छोट्या दुकानांत कपडे खरेदी करणार्‍या ग्राहकांना आणि व्यापार्‍यांना या निर्णयाची सर्वाधिक झळ बसणार आहे.
विनोद नगरिया, उपाध्यक्ष – फेडरेशन ऑफ मुंबई रिटेल क्लॉथ डीलर्स असोसिएशन

Back to top button