महामुंबईतील ४ डान्सबारचे परवाने रद्द | पुढारी

महामुंबईतील ४ डान्सबारचे परवाने रद्द

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राज्यभर कोरोना रोखण्यासाठी रात्रीची जमावबंदी असतानाही नवी मुंबईत बिनधास्त सुरू असलेले डान्सबार मंगळवारी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत गाजले. ठाणे, मुंबई, नवी मुंबईतील सहा डान्सबारवर गुन्हे दाखल करण्यात आले असून चार बारचे परवाने रद्द करण्यात आल्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केली.

माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी डान्सबार बंदी केली. मात्र आता मुंबईत डान्सबारमध्ये बारबालांना लपवण्यासाठी अक्षरशः बंकर खोदण्यात आले आहेत. राजरोसपणे डान्सबार सुरू असताना पोलीस कारवाई करत नाहीत, असा मुद्दा विरोधकांनी मांडला.

त्यावर गृहमंत्री म्हणाले, कायदा मोडणार्‍या डान्सबारवर कारवाई सुरू आहे. मात्र छुप्या पद्धतीने खालच्या स्तरावर गडबडी केल्या जातात. आता 10 बार मालकांना परवाने रद्द का करण्यात येऊ नयेत अशी विचारणा करणार्‍या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

यापुढे आता डान्सबार सुरू आढळल्यास केवळ कनिष्ठ अधिकार्‍यांवर कारवाई करून चालणार नाही. वरिष्ठ अधिकार्‍यांवरच येत्या काळात जबाबदारी निश्चित करण्यात येईल. आणि डान्सबार सुरू आढळल्यास थेट वरिष्ठ अधिकार्‍यांवरच कारवाई केली जाईल, असा इशाराही गृहमंत्र्यांनी दिला.

पोलीस भरती टप्प्याटप्प्याने

यापुढे पोलीसांच्या बदलीसाठी कोणालाही एक रुपयाही घेऊ देणार नसून त्याबाबत तक्रार मिळाल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारा यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला. राज्याच्या पोलिस दलातील 50 हजार जागा रिक्त असून टप्या टप्याने सदर रिक्त पदे भरण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरेकरांचा सरकारवर हल्लाबोल

नवी मुंबईत पोलीसांच्या नाकावर टिच्चून पोलीस ठाण्याशेजारीच आणि संपूर्ण शहरात खुलेआम डान्सबार सुरू आहेत. एवढेच नव्हे तर तेथे वैश्याव्यवसायासारखी गैरकृत्ये सरू आहेत असा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला. याला उत्तर देताना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी कारवाई करण्याचे आश्वासन सभागृहाला दिले.

न्यायालयाच्या परवानगीने केवळ लाईव्ह ऑर्केस्ट्राला अटी व शर्ती घालून शासनाने परवानगी दिली आहे. मात्र, त्याच्या आडून गैरकृत्ये होत असतील तर त्यावर तातडीने कारवाई केली जाईल. याबाबत नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी बैठक बोलावली आहे. गृहराज्यमंत्री (शहरे) सतेज पाटील आणि मी यात लक्ष घालत आहे, असे देसाई यांनी विधान परिषदेत सांगितले.

Back to top button