मुंबईमध्ये पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्याची पालिकेची तयारी | पुढारी

मुंबईमध्ये पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्याची पालिकेची तयारी

मुंबई ; चेतन ननावरे : मुंबईतील निर्बंध शिथील केल्यानंतर आणि ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्यानंतर येथील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. गेल्या आठवड्याभरात मुंबईतील दररोज सापडणार्‍या कोरोना रुग्णांचा आकडा 600 टक्क्यांनी वाढला आहे. परिणामी, रुग्णवाढीचा दर 0.03 टक्क्यांवरून 0.09 टक्क्यांपर्यंत तिप्पटीने वाढला आहे. एकूणच परिस्थिती पाहता नाईट कर्फ्यूनंतरही रुग्णवाढीचा दर नियंत्रत आला नाही, तर नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात आणखी कठोर निर्बंध लादण्याची शक्यता मुंबई महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकार्‍याने व्यक्त केली.

संबंधित अधिकार्‍याने सांगितले की, प्राथमिक स्वरुपात नाताळ आणि थर्टीफर्स्टच्या पार्ट्यांवर निर्बंध आणण्याचे धोरण अवलंबण्यात येत आहे. मात्र मास्कचा घटता वापर आणि सोशल डिस्टसिंगच्या नियमाचे उल्लंघन या कारणांमुळे मुंबईतील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. याच वेगाने रुग्णसंख्या वाढत राहिल्यास मकरसंक्रांतीआधीच मुंबईत दररोज सापडणार्‍या नव्या कोरोना रुग्णांची संख्या 5 हजारांचा टप्पा ओलांडण्याची भीती आहे.

ही परिस्थिती उद्भवू नये, म्हणून मनपा प्रशासनाकडून जानेवारीच्या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कठोर निर्बंध लादण्यात येतील. तूर्त पुढील दोन आठवड्यांत समोर येणार्‍या रुग्णसंख्येवर प्रशासनाचे बारीक लक्ष असल्याचे त्या अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

मुंबईत आठवड्याभरापूर्वी कोरोना रुग्णांच्या संख्येनुसार 17 इमारतींना मनपाने सील केले होते. सील केलेल्या इमारतींचा आकडा आता 37 पर्यंत वाढला आहे. याशिवाय मुंबईत एका सक्रिय कंटेनमेंट झोनचीही भर पडली आहे. आठवड्यापूर्वी 2 हजार 095 दिवसांवर असलेला रुग्ण दुप्पटीचा कालावधी आता 841 दिवसांपर्यंत कमी झालेला आहे. ही निश्चितच मुंबईकरांच्या चिंतेत भर टाकणारी माहिती असल्याचे मनपाने स्पष्ट केलेले आहे.

Back to top button