

नवी मुंबई ; पुढारी डेस्क : नवी मुंबईचा धाडसी जलतरणपटू आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेता शुभम वनमाळी याने आता नवाच विक्रम रचला आहे. गेट वे ऑफ इंडिया ते पालघरमधील डहाणू बीच हे 140 किलोमीटरचे अंतर शुभमने 5 दिवसांत पार केले.
समुद्राच्या लाटा अंगावर घेत पोहताना त्याला एकदा जेलीफिशने डंख दिला, त्यातून ताप चढला. तरीही शुभम सलग पाच दिवस न थांबता पोहत राहिला. शुभमच्या सोबतीला सतत एक बोट होती. मात्र, या बोटीचा आसरा घेण्याची वेळ त्यावर आली नाही.
शुभम डहाणू बीचवर पोहोचला तेव्हा त्याचे प्रचंड जल्लोशात स्वागत झाले. या स्वागताने तो भारावला. आजवर इतके अंतर कधी कुणी पार केले नाही. गेट वे ते डहाणू पोहण्याचा प्रयत्न आजवर झाला नाही. या यशाने मला आणखी आव्हाने स्वीकारण्याची प्रेरणा मिळाली, असे सांगतानाच शुभमने पुढील इरादाही जाहीर केला. 2022 मध्ये तो आता मुंबई ते गोवा हे 413 किलोमीटरचे सागरी अंतर पोहून पार करणार आहे.