Rajesh Tope : राज्‍यात संपूर्ण लॉकडाऊन नाही : आरोग्यमंत्री राजेश टोपे | पुढारी

Rajesh Tope : राज्‍यात संपूर्ण लॉकडाऊन नाही : आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : दक्षिण अफ्रिकेत सापडलेल्या ओमायक्रॉनच्या विषाणुने जगभरासह देशात थैमान घालायला सुरू केले आहे. दरम्यान राज्यातही ओमायक्रॉनच्या रुग्णसख्येत वाढ होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (दि.२४) रात्री ९ ते पहाटे ६ पर्यंत निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. आज आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी याबाबत पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. त्यांनी लॉकडाऊन होणार का यावर सविस्तर चर्चा केली.

मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयावर राज्यात पुन्हा लॉकडाऊनच्या लागणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. याच मुद्द्यावर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सविस्तर भाष्य केले आहे. राज्यात संपूर्ण लॉकडाऊनची शक्यता फेटाळून लावली याचबरोबर आरोग्यमंत्री टोपेंनी लॉकडाऊनची गरज नेमकी कधी लागेल, याची माहिती दिली. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Rajesh Tope : ‘त्‍या’दिवशी घ्‍यावा लागेल लॉकडाऊनचा निर्णय

लॉकडाऊनचा निर्णय घेताना यापुढे ऑक्सिजनच्या उपलब्धतेच्या अनुषंगानेच घेतला जाईल. ज्यादिवशी राज्याला ८०० मॅट्रीक टन ऑक्सिजन लागेल त्यादिवशी आपल्याला लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल, असे टोपे यांनी स्‍पष्‍ट केले. राज्य सरकारला निर्बंध लावायचे नाहीत. तसा आमचा हेतू देखील नाही. फक्त काळजीपोटीच आम्ही हे निर्बंध लावत आहोत. त्यामुळे निर्बंधांबाबत चुकीचा अर्थ काढू नये. या निर्णयाकडे सकारात्‍मकतेने पाहावे, असे आवाहनही त्‍यांनी केले.

ओमायक्रॉनच्या संसर्गाची गती जर दुप्पट आहे. तर याचा अर्थ लक्षात घ्या आपल्याकडे सध्या जो ६०० ते ७०० चा आकडा होता तो आता १४०० पर्यंत वाढत आहे. त्यात ओमायक्रॉनचे राज्यातील रुग्णाचा आकडा १०० च्या घरात गेला आहे. संसर्गाची गती वाढत गेली तर आता तिसरी लाट आलीच तर ती ओमायक्रॉनचीच असेल, अशी शक्यता आहे, असे राजेश टोपे म्हणाले.

राज्याचे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला या निर्बंधांमागचं प्रमुख कारण म्हणजे, युरोप, अमेरिका आणि फ्रान्समध्ये ओमायक्रॉनच्या संसर्गाची गती एका दिवसात दुप्पट होऊ शकते इतकी आहे हे दिसून आले आहे. संसर्ग वेगाने हाेत आहे; पण त्याबाबत भीती बाळगण्याची गरज नाही. कारण मृत्यूदर अधिक नाहीय. असे असले तरी काळजी घेणे गरजेचे आहे. या सर्व पार्श्वभूमीवर माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की नववर्षाचं स्वागत नक्की सर्वांनी करावे, पण नियम पाळून वागावे, असे आवाहनही टाेपे यांनी केले.

हेही वाचलं का?  

Back to top button