मुंबई ; सुरेखा चोपडे : उपनगरीय रेल्वेवर जानेवारी ते नोव्हेंबर या 11 महिन्यांच्या कालावधीत अपघातांत मृत्यू झालेल्यांपैकी 434 मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. रेल्वे पोलिसांच्या अथक प्रयत्नांनंतरही वारसांचा शोध लागत नसल्यामुळे हे मृतदेह बेवारस राहिले आहेत. ओळख न पटलेल्या मृतदेहांमध्ये सर्वाधिक संख्या मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकातील अपघातांमध्ये जीव गमावलेल्या व्यक्तींची आहे.
उपनगरीय रेल्व मार्गावर दिवसभरात 8 ते 10 प्रवासी, नागरिकांचा अपघाती मृत्यू होतो. गर्दीमुळे प्रवाशांना लोकलमध्ये चढणे-उतरणे अवघड होते. काही प्रवासी स्थानकात लवकर पोहोचण्यासाठी पादचारी पुलांचा वापर न करता रूळ ओलांडतात आणि लोकलखाली येतात. लोकलच्या दारात लटकणारे काही प्रवासी रुळांलगतच्या खांबांचा फटका बसून खाली पडतात. लोकलच्या दारात उभे असताना तोल जाणे, डब्यातील गर्दीमुळे खाली पडणे, ओव्हरहेड वायरला स्पर्श होणे अशा अपघातांत प्रवाशांचा मृत्यू होतो.
अनेकदा मृतांचे चेहरे किंवा इतर अवयवांवरून ओळख पटवण्याचा प्रयत्न करावा लागतोे. अशा मृतांच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यासाठी रेल्वे पोलिसांना यातायात करावी लागते. जानेवारी ते नोव्हेंबर या 11 महिन्यांच्या कालावधीतील रेल्वे अपघातांध्ये 1,574 जणांचा मृत्यू झाला. यातील 1,140 मृतदेहांची ओळख पटली, मात्र 434 मृतांच्या वारसांचा शोध लागला नसल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.
कल्याण स्थानकात सर्वाधिक संख्या
मध्य रेल्वेवरील कल्याण जंक्शन स्थानकातून उपनगरीय रेल्वे आणि लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेसची वाहतूक होते. कल्याण स्थानकात 11 महिन्यांत 262 जणांचा अपघाती मृत्यू झाला. त्यापैकी 201 मृतांची ओळख पटली, तर 61 मृतदेहांची ओळख पटलेली नाही.
शोध घेण्यासाठी पराकाष्ठा
मृतांंच्या वारसाचा शोध घेण्यासाठी रेल्वे पोलीस विविध मार्ग अवलंबतात. मृताची माहिती मिळवणे, तपास यादी वेगवेगळ्या स्थानकांना पाठवणे, मृताची छायाचित्रे स्थानकांत, सार्वजनिक ठिकाणी फलकांवर लावणे. अन्य प्रवाशांकडे चौकशी करणे अशी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते.
पोलिसांमार्फत अंत्यसंस्कार
बेवारस व्यक्तीचा मृतदेह नियमानुसार सात दिवस ठेवता येतो. मृताच्या कुटुंबीयांचा शोध लागावा यासाठी हे मृतदेह 15 ते 20 दिवस शवागारात ठेवले जातात. या काळात वारसांचा शोध लागला नाही, तर मृतदेहांवर नियमानुसार पोलिसांमार्फत अंत्यसंस्कार केले जातात. त्यापूर्वी मृत व्यक्तीचे डीएनए जतन केले जातात.