राज्यात १० महिन्यांत दीड लाख मुलांना कोरोना

राज्यात १० महिन्यांत दीड लाख मुलांना कोरोना
Published on
Updated on

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राज्यात गेल्या 10 महिन्यांत 1 लाख 42 हजार लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली. त्यातही 10 वर्षांखालील कोरोना बाधित मुलांचे प्रमाण 3.19 टक्के आणि 11 ते 20 वयोगटातील कोरोना ग्रस्तांचे प्रमाण 7.46 टक्क्यांवर गेल्यामुळेे तज्ज्ञांकडून भीती व्यक्त केली जात आहे. लवकरात लवकर लहान मुलांचे लसीकरण सुरू करण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

लहान मुलांना कोविडचा धोका कमी असल्याचे मत यापूर्वी व्यक्त करण्यात आले होते. सध्या राज्यातील अनेक भागांत कोरोनाबाधित मुलांचे प्रमाण वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यात फेब्रुवारीपर्यंत 70,459 बालकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर केवळ 10 महिन्यांत 1,42,329 मुले कोरोनाच्या विळख्यात सापडली आहेत. आतापर्यंत राज्यभरात 10 वर्षांखालील 2,12,788 म्हणजे 3.19 टक्के लहान मुलांना कोरोनाबाधा झाली आहे.

कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या काळात बालकांना लागण होण्याचे प्रमाण अत्यल्प होते. जून-जुलै महिन्यांत कोरोनाचा कहर सुरू असतानाही लहान मुलांना संसर्ग होण्याचे प्रमाण नियंत्रणात होते. गेल्या वर्षी जुलैमध्ये राज्यातील कोरोनाबाधित बालकांची संख्या केवळ 9121 होती. हे प्रमाण एकूण रुग्णांच्या 3.72 टक्के होते. त्यावेळी राज्यातील एकूण रुग्णसंख्या 2,54,437 होती. सुरुवातीचे सहा महिने लहान मुलांमधील कोरोना रुग्णांची संख्या 25 हजारांच्या आतच होती; मात्र वर्षभरात हा आकडा 70,459 वर पोहोचला.

नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती अधिक असल्याने लहान मुलांंमध्ये कोरोनाची गंभीर लक्षणे आढळत नाहीत. मात्र, गंभीर आजार असलेल्या मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे. मुलांनाही शासनाने आखलेल्या नियमांचे पालन करायला पालकांनी शिकवायला हवे. लहान मुलांचे लसीकरण लवकर सुरू झाले, तर धोका नक्कीच कमी होईल.
– डॉ. समीर दलवाई, बालरोग तज्ज्ञ, राज्य टास्क फोर्स

प्रथम 12 ते 17 वयोगटात आणि नंतर 12 वर्षांखालील मुलांचे लसीकरण केले पाहिजेे. शाळांमध्ये लसीकरणासाठी लवकर परवानगी मिळण्याची गरज आहे. मुले एकमेकांमध्ये मिसळत असल्यामुळे कोरोना पसरू लागला आहे. मुलांमुळे घरातील वृद्ध आणि अन्य आजार असलेल्या तसेच लसीचे दोन डोस न झालेल्यांना त्रास जाणवू शकतो.
– अविनाश सुपे, टास्क फोर्स, मृत्यू विश्‍लेषण समिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news