Pudhari Mahasummit 2026 | सिंहस्थ निधीतील ८५ टक्‍के कामे कायमस्वरूपी : आयुक्त शेखर सिंह

नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या विकासाला दीर्घकालीन बळ
Pudhari Mahasummit 2026 |
Pudhari Mahasummit 2026 | सिंहस्थ निधीतील ८५ टक्‍के कामे कायमस्वरूपी : आयुक्त शेखर सिंहM.S.B
Published on
Updated on

मुंबई : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये तब्बल ३४ हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरू असून, त्यातील केवळ १५ टक्के कामे साधुग्रामसह अन्य तात्पुरत्या सुविधांसाठी होत आहेत. तब्बल ८५ टक्के कामे स्थायी स्वरूपाची असून, सिंहस्थ संपल्यानंतरही नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी ती कायमस्वरूपी उपयोगी पडणार आहेत, अशी ग्वाही सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.

‘पुढारी न्यूज’च्या महासमिट कार्यक्रमात झालेल्या मुलाखतीत सिंह यांनी सिंहस्थाच्या नियोजनाबाबत सविस्तर भूमिका मांडली. ते म्हणाले, सिंहस्थाच्या नावाखाली सुरू असलेली बहुतांश कामे केवळ कुंभमेळ्यापुरती मर्यादित नसून, शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन पायाभूत सुविधा सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे. रस्ते, पाणी, वाहतूक, घाट आणि अन्य मूलभूत सुविधांवरील स्थायी कामांमुळे सिंहस्थानंतरही त्याचा मोठा फायदा नाशिककरांना होणार आहे. शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर विकासकामे एकाचवेळी सुरू असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, हे वास्तव असल्याचे सिंह यांनी मान्य केले. रस्त्यांवरील खड्डे किंवा नागरिकांची गैरसोय याचे कोणत्याही प्रकारे समर्थन करता येणार नाही. मात्र सिंहस्थाच्या मुख्य पर्वणीपूर्वी शहरातील कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांसह सर्व प्रमुख मार्ग सुरळीत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

गुणवत्तेत तडजोड नाही

कामे वेगाने पूर्ण करण्याच्या नादात गुणवत्तेशी तडजोड केली जाणार नाही. विकासकामांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी चार पातळ्यांवर यंत्रणा कार्यरत आहे. विभागीय स्तरापासून प्रकल्प स्तरापर्यंत कामांची तपासणी केली जात आहे. कामाचा वेग आणि गुणवत्ता यांचा समतोल राखण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे सिंह यांनी सांगितले.

डंपर खचण्याचा सिंहस्थाशी थेट संबंध नाही

शहरातील एका रस्त्यावर डंपर खचल्याच्या घटनेचा सिंहस्थाच्या कामांशी थेट संबंध नसल्याचे सिंह यांनी स्पष्ट केले. संबंधित रस्ता सुमारे २० वर्षे जुना असून, ड्रेनेज व्यवस्थेतील त्रुटींमुळे ही घटना घडली. महापालिकेकडून त्यावर कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

नाशिक-त्र्यंबकचे नियोजन अधिक आव्हानात्मक

प्रयागराजच्या तुलनेत नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील सिंहस्थाचे नियोजन अधिक आव्हानात्मक आहे. प्रयागराजमध्ये नदीकाठचा १० ते १५ हजार एकरांचा विस्तीर्ण परिसर उपलब्ध असतो. नाशिकमध्ये अशी सलग मोठी खुली जागा उपलब्ध नसून, पावसाळ्यात सिंहस्थ होणार असल्याने भौगोलिक आणि हवामानविषयक आव्हानेही मोठी आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

गर्दीचे विभाजन करण्यासाठी नाशिकमध्ये १२ नवीन घाट, तर त्र्यंबकेश्वरमध्ये गोदावरी नदीलगत सुमारे ३.१ किलोमीटर लांबीचे दोन नवीन घाट उभारले जात आहेत. त्र्यंबकेश्वरमध्ये गोदावरीला बारमाही पाणी उपलब्ध व्हावे यासाठी बेझे धरणातून पाणी उचलून अहिल्या धरणात सोडण्याचा वॉटर ग्रीड प्रकल्पही राबविला जात आहे, अशी माहिती सिंह यांनी दिली.

गर्दी वाढण्यापूर्वीच मिळणार ‘अलर्ट’

सिंहस्थातील गर्दी व्यवस्थापनासाठी एआय, व्हिडीओ अ‍ॅनालिटिक्स, सीसीटीव्ही आणि इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर (आयसीसीसी) यांचा एकात्मिक वापर केला जाणार आहे. एखाद्या भागात भाविकांची घनता धोकादायक पातळीवर जाण्यापूर्वीच सॉफ्टवेअरच्या माध्यमातून प्रशासनाला अलर्ट मिळेल. त्यानुसार मागील बाजूने येणारा भाविकांचा ओघ नियंत्रित अथवा तात्पुरता थांबविता येणार आहे. त्यामुळे चेंगराचेंगरीसारख्या घटना टाळण्यास मदत होणार आहे, असे सिंह यांनी सांगितले.

आऊटर पार्किंगपासून घाटापर्यंत नियोजन

भाविकांसाठी आऊटर पार्किंगपासून शटल बस, त्यानंतर इनर पार्किंग, तेथून होल्डिंग एरिया आणि पुढे घाट असा प्रवास नियोजित करण्यात आला आहे. स्नानानंतर भाविकांचा परतीचा प्रवासही सुरक्षित आणि नियंत्रित पद्धतीने व्हावा, यासाठी स्वतंत्र नियोजन केले जात आहे. सिंहस्थाच्या काळात बाहेरून येणाऱ्या भाविकांसोबतच नाशिककरांना कमीत कमी त्रास होईल, यालाही प्राधान्य देण्यात आले आहे. वाहतूक व्यवस्थापन, पर्यायी मार्ग आणि विविध विभागांमधील समन्वय यावर विशेष लक्ष दिले जात असल्याचे सिंह यांनी स्पष्ट केले.

प्राधिकरणाची भूमिका समन्वयाची

सिंहस्थ प्राधिकरण ही थेट अंमलबजावणी करणारी यंत्रणा नसून, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएनजीएल यांसह विविध विभागांमध्ये समन्वय साधणे आणि कामांमधील त्रुटी दूर करणे ही प्राधिकरणाची प्रमुख जबाबदारी आहे. शहरातील प्रत्येक विकासकाम सिंहस्थाशी जोडले जात असल्याने नागरिकांमध्ये निर्माण होणारे गैरसमज दूर करण्यासाठीही समन्वयाची भूमिका महत्त्वाची असल्याचे सिंह यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news