मुंबईत कोरोना मृत्यूला दुसर्‍यांदा ब्रेक | पुढारी

मुंबईत कोरोना मृत्यूला दुसर्‍यांदा ब्रेक

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबईत कोरोना मृत्यूला शनिवारी दुसर्‍यांदा ब्रेक बसला. गेल्या काही दिवसापासून रोज1 ते 5 जणांचा मृत्यू होत असताना गेल्या 24 तासांत मात्र कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. मुंबईकरांसाठी ही दिलासा देणारी बातमी होय.

कोरोनाची महामारी आल्यापासून मृत्यू नाही असे मुंबईत दीड वर्षात दुसर्‍यांदा घडले. गेल्या 18 ऑक्टोबरला कोरोनाचा एकही बळी गेला नाही. त्यानंतर 11 डिसेंबरला शनिवारीही कोरोनाच्या मृत्यूला ब्रेक बसला. 256 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 221 जण बरे झाले.

काही दिवसांपासून रोजची रुग्ण संख्या 150 ते 200 च्या घरात असली तरी रोजचे बळींचे प्रमाण 1 ते 5 दरम्यान राहिले. कोरोनाच्या पहिल्या लाटेत 24 तासांत 100 ते 125 पेक्षा जास्त रुग्णांचे मृत्यू होत होते. ही संख्या घटत जाऊन 10 ते 15 वर आली. दोन महिन्यांपासून रोजचे मृत्यू सहा ते सातच्या खालीच आले आहेत. आतापर्यंत मुंबईत 16 हजार 355 जणांचा कोरोनाने बळी घेतला.

सध्या 1 हजार 808 सक्रिय रुग्ण असून, मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर 97 टक्के इतका आहे. मुंबईत कंटेन्मेंट झोनची संख्या शून्यावर आली असली तरी आजही 11 इमारती सील आहेत. 4 ते 10 डिसेंबर दरम्यान, मुंबईत कोरोना वाढीचा दर फक्‍त 0.04 टक्के इतका राहिल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

कोरोना अपडेट

7,992 नवे कोरोना रुग्ण शनिवारी देशभरात आढळलेे, तर 393 रुग्णांचा मृत्यू झाला.
807 नव्या रुग्णांची नोंद महाराष्ट्रात झाली, तर 20 रुग्णांचा मृत्यू झाला.

Back to top button