शालेय गणवेशात कोंडतोय मुलींचा श्वास! फ्रॉक, पिनोफ्रॉक, स्कर्टमुळे हालचालींवर मर्यादा

शालेय गणवेशात कोंडतोय मुलींचा श्वास! फ्रॉक, पिनोफ्रॉक, स्कर्टमुळे हालचालींवर मर्यादा

मुंबई : नमिता धुरी : मैदानी खेळांपासून तर घर ते शाळा प्रवासापर्यंत सगळीकडे संकोचून टाकणाऱ्या आणि लाज आणणाऱ्या शालेय गणवेशांनी मुंबईसह राज्यभरातील मुली हैराण आहेत. राज्य शासनाच्या नव्या गणवेश धोरणानेही यात कोणताही दिलासा दिलेला नाही. परिणामी, शालेय गणवेशात तोंड दाबून बुक्क्यांचा मार या मुली सहन करत आहेत.

पिनोफ्रॉक, स्कर्ट, सलवार- कमीज आणि ओढणी असे गणवेश मुलींच्या शारीरिक हालचालींवर मर्यादा आणतात, हे लक्षात न घेता नव्या गणवेश धोरणातही मुलींच्या माथी गणवेशाचे हेच प्रकार थोपवण्यात आले आहेत. 'एक राज्य एक गणवेश' योजनेबाबतचा शासन निर्णय १० जूनला जाहीर झाला. यानुसार शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एकसमान गणवेश निश्चित करण्यात आला आहे. पहिली ते चौथीच्या मुलींसाठी पिनोफ्रॉक, पाचवीच्या मुलींसाठी स्कर्ट आणि शर्ट, सहावी ते आठवीच्या मुलींसाठी सलवार, कमीज आणि ओढणी असा गणवेश ठरवण्यात आला आहे. स्काऊट आणि गाईडसाठीही अशाच प्रकारचा गणवेश देण्यात येणार आहे. याउलट मुलांसाठी शर्ट आणि पँट असा गणवेश दिला जाईल. हे गणवेश धोरण तुलनेने अधिक संख्या असलेल्या खासगी शाळांना मात्र लागू नाही.

प्रत्येक खासगी शाळा आपल्याला सुचेल तो गणवेश ठरवते. त्यातही मुलींचा म्हणून वेगळा विचार दिसत नाही. खासगी शाळांमध्ये गणवेश ठरवताना व्यवस्थापन स्तरावर प्रस्ताव तयार करून त्यावर पालक-शिक्षक संघाची मान्यता घेतली जाते. पण पालकांमध्येही गण- वेशाबाबत फारशी जागृती नाही.

स्कर्ट उडतो, फ्रॉकही उडतो

शाळेतील क्रीडा विषयाच्या नियमित तासिकांनाही मुली विविध खेळांत हौसेने सहभाग घेतात. अशा वेळी धावताना, व्यायाम करताना किंवा खेळासाठी आवश्यक हालचाली करताना फ्रॉक आणि स्कर्ट उडतो किंवा पायांत अडखळतो. त्यामुळे खेळातून लक्ष विचलित होते. पालिका शाळांमध्ये सलवार-कमीजसोबत ओढणीही अनिवार्य असते. ही ओढणी धावताना उडत असल्याने अनेकदा अडथळा ठरते.

ओंगळवाणे पायजमे

पुरुष शिक्षकांसमोर किंवा वर्गमित्रांसोबत खेळताना काही वेळा मुलींना संकोच वाटतो. याउलट मुलग्यांसाठी शर्ट-पँट असा सोयीचा गणवेश निश्चित केला जात असल्याने त्यांना मुलींपेक्षा अधिक मोकळे- पणाने वावरता येते. काही मुली फ्रॉकच्या खाली स्वतःहून पायजमा घालतात. प्रत्येकीच्या पायजम्याचे स्वरूप आणि रंगछटा वेगवेगळ्या असल्याने हे चित्र ओंगळवाणे दिसते. त्यामुळे आता मुलींच्या गण- वेशात कालानुरूप बदल होण्याची गरज आहे.

बिनमापाच्या गणवेशात घुसमट

आजकाल मुलींना ओढणी वापरण्याची सवय नसते; मात्र पालिका शाळेत ओढणी अनिवार्य आहे. गणवेश ठरवताना पालकांचे मत विचारात घेतले जात नाही. तसेच मुलींच्या शरीराचे मापही घेतले जात नाही. त्यामुळे सुदृढ शरीरयष्टीच्या मुलींना गणवेश घट्ट होतो. अक्षरशः श्वास कोंडतो, अशी तक्रार पालक श्वेता पावसकर यांनी 'पुढारी'शी बोलताना केली.

बस, दुचाकीवरून प्रवास करताना आणि गर्दीमध्ये पंजाबी ड्रेसची ओढणी अडकण्याचा धोका असतो. त्यामुळे काही पालक पंजाबी ड्रेसच्या विरोधात आहेत, अशी माहिती 'महाराष्ट्र राज्य विद्यार्थी, पालक, शिक्षक महासंघा'चे नितीन दळवी यांनी दिली. पालिकेने गणवेश ठरवताना पालक आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

मुंबईतील गणवेश परंपरा

अनेक खासगी शाळांमध्येही वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीचेच गणवेश मुलींना दिले जात असून, या परंपरेतही मुलींच्या नशिबी त्याच त्या गणवेशांचा जाच सुरू आहे. बालमोहन आणि पार्ले-टिळक या शाळांमध्ये मुलींसाठी पिनोफ्रॉक आणि शर्ट असा गणवेश आहे. पार्ले- टिळकचा गणवेश गेली १०३ वर्षे तसाच आहे. डीएस हायस्कूलने पाचवी ते दहावीच्या मुलींना पिनोफ्रॉकसोबत सलवारही दिली आहे.

धावताना, खेळताना स्कर्ट वर उडतो. पँट घालून मोकळेपणाने खेळता येते. त्यामुळे मुलींचा गणवेश पॅट, टी-शर्ट असाच असावा.

श्रुती उतेकर, राष्ट्रीय मल्लखांबपटू

खेळासाठी ट्रॅक-पॅट, टी-शर्ट हे कपडे सोयीचे ठरतात. आरोग्यासाठी मुलींनी किमान अर्धा तास तरी खेळले पाहिजे. पण खेळताना मुलांसमोर आपला गणवेश वर झाला तर काय अशी भीती असते. त्यामुळे प्रत्येक शाळेने याचा विचार करून मुलींना सोयीचा गणवेश द्यावा.

सुवर्णा बारटक्के-पालव, आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू

आधी आमच्या शाळेचा गणवेश फ्रॉक होता. त्यामुळे उठता-बसताना, खाली वाकताना स्कर्ट गैरसोयीचा असायचा." त्यानंतर आम्हाला पँट आणि शर्ट असा गणवेश देण्यात आला. पैंटमुळे मोकळेपणाने वावरता येत होते.

हर्षिता वायंगणकर, राष्ट्रीय मल्लखांबपटू

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news