निकालाचे केवळ विश्लेषण नको; प्रामाणिक आत्मपरीक्षण करा | पुढारी

निकालाचे केवळ विश्लेषण नको; प्रामाणिक आत्मपरीक्षण करा

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : निकालाचे केवळ विश्लेषण करून चालत नाही, रणनीतीसुद्धा हवी. त्यासाठी प्रामाणिक आत्मपरीक्षण करावे लागते, असे खडे बोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या प्रदेश पदाधिकार्‍यांना शुक्रवारी सुनावले. लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रातून अपेक्षित यश मिळाले नाही. विरोधकांच्या प्रभावी प्रचारासमोर भाजपची यंत्रणा तोकडी पडली. या पार्श्वभूमीवर आता विधानसभा निवडणुकांनाही सामोरे जायचे आहे. त्यामुळे भाजप आता ‘अलर्ट मोड’वर आली आहे.

दादर येथील वसंतस्मृती कार्यालयात भाजपच्या प्रदेश कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक शुक्रवारी पार पडली. नरेंद्र मोदी तिसर्‍यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्याबद्दल अभिनंदनाचा तसेच विकसित भारताच्या संकल्पाचा ठराव या बैठकीत मांडण्यात आला. याशिवाय केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासह महाराष्ट्रातील नवनिर्वाचित भाजप खासदारांचा यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री गोयल, मंत्री रक्षा खडसे, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, अशोक चव्हाण, खा. उदयनराजे यांच्यासह सर्व खासदार आणि महत्त्वाचे नेते, प्रदेश स्तरावरील पदाधिकारी उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकांसाठी विरोधकांचा नॅरेटिव्ह खोडून काढण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. त्यासाठी भाजप नेते राज्यभर फिरणार
आहेत. विशेषतः 48 लोकसभा मतदारसंघांसाठी निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. भाजपच्या मतदारसंघांतील पराभवाची नेमकी कारणे शोधली जाणार असून त्याबाबतचा अहवालही तयार केला जाणार आहे.

मराठा समाजाचे प्राबल्य असलेल्या मतदारसंघांत जाऊन लोकांची मतेही जाणून घ्या. कुणीही गाफील राहू नका, विरोधकांना कमी समजू नका, असे आवाहनही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पदाधिकार्‍यांना केले.

फडणवीसांनी दिल्या कानपिचक्या

लोकसभा निकालांचे आकडेवारीसह विश्लेषण करतानाच फडणवीस यांनी पदाधिकार्‍यांना काचपिचक्याही दिल्या. लोकसभेच्या निकालांनी आभाळ कोसळले नसल्याचे सांगत मतदानाची आकडेवारीही फडणवीसांनी मांडली. राज्यात आपल्याला केवळ दोन लाख मते कमी पडली तर मुंबईत दोन लाख मते अधिक मिळाली. एकूण 130 विधानसभा मतदारसंघात आपली आघाडी आहे. मात्र, प्रचंड ध्रुवीकरण झाल्याने आपली संख्या कमी झाली. संविधान बदलणार हा नॅरेटिव्ह चालला. पहिल्या तीन टप्प्यांत त्याची तीव्रता अधिक होती. त्यामुळे 24 पैकी केवळ 4 जागा मिळाल्या. नंतर या नॅरेटिव्हला खोडून काढण्यासाठी आपण प्रतिवाद केला आणि पुढच्या 24 जागांपैकी 13 जागा मिळाल्याचे फडणवीसांनी सांगितले.

Back to top button