महिलेच्या मानेतून एक किलोची थायरॉईडची गाठ काढण्यात डॉक्टरांना यश

महिलेच्या मानेतून एक किलोची थायरॉईडची गाठ काढण्यात डॉक्टरांना यश

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : लीलावती हॉस्पिटलमध्ये एका ३३ वर्षीय महिलेच्या मानेतून १ किलो वजनाची थायरॅाईड गाठ काढण्यात डॉक्टरांना यश मिळाले आहे. रूग्णालयातील थायरॉईड आणि एंडोक्राइन सर्जन डॉ. रितेश अग्रवाल, कार्डियाक सर्जन डॉ. कृष्णा प्रसाद आणि ईएनटी सर्जन डॉ. प्रीती धिंग्रा यांच्या नेतृत्वाखाली एका टीमने ही यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. साधारणतः पाच तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. या शस्त्रक्रियेत डॉ. वैभवी बक्षी यांनी रुग्णाला योग्य भूल दिली.

प्रिशा शेट्टी (नाव बदललेलं) या पुण्यातील रहिवाशी आहेत. या महिलेला गेल्या २ वर्षांपासून तीव्र श्वसनचा त्रास जाणवत होता. अनेक डॉक्टरांकडून उपचार घेतले. परंतु, प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. महिलेची बिघडती प्रकृती लक्षात घेता कुटुंबियांनी त्यांना मुंबईतील लिलावती रूग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय चाचणीनंतर महिलेच्या मानेमध्ये गाठ असल्याचं दिसून आले. त्यानंतर एक्स-रे, सीटी स्कॅन आणि थायरॉईड फंक्शन चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली.

छातीचे हाड न कापता फक्त मानेपासून शस्त्रक्रिया

लिलावती रूग्णालयातील थायरॉईड आणि एंडोक्राइन सर्जन डॉ. रितेश अग्रवाल म्हणाले की, गॅाइटर ही एक अशी स्थिती आहे जिथे गाठी तयार झाल्यामुळे किंवा सूज वाढल्याने थायरॉईड ग्रंथीची वाढ होते. या महिलेला थायरॉईड ग्रंथी वाढून गलगंड झाले होते. जेव्हा या भागात मोठ्या गाठी असतात, तेव्हा ते श्वसननलिकेवर दाब येतो ज्यामुळे योग्य ऑक्सिजन पुरवठा होत नाही आणि रुग्णांना श्वासोच्छवासाच्या समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच या गाठीच्या वजनामुळे छातीत जडपणा येतो. थायरॉईड ग्रंथीला श्वसननलिकेच्या दोन्ही बाजूला दोन बाजू असतात आणि तिच्या दोन्ही बाजूंना मोठ्या गाठी असतात. ते इतके मोठे होते की मानेपासून ते छातीच्या आत शिरते आणि छातीतून जवळजवळ हृदयापर्यंत पोहोचते. अशा प्रकरणांमध्ये, गोइटर योग्यरित्या काढण्यासाठी छातीचे हाड कापणे आवश्यक आहे. आम्ही छातीचे हाड न कापता फक्त मानेपासून शस्त्रक्रिया केली आणि छाती न उघडता संपूर्ण गलगंड यशस्वीपणे काढून टाकला.

सूक्ष्म विच्छेदन करून मज्जातंतू वाचविला

डॉ. अग्रवाल पुढे म्हणाले, महिलेवर टोटल थायरॉइडेक्टॉमी केली, म्हणजे थायरॉईड ग्रंथीचे सर्व भाग काढून टाकले. अशा थायरॉईड शस्त्रक्रिया खूप कठीण आणि आव्हानात्मक असतात, कारण नसा ते व्होकल कॉर्ड्स ग्रंथीच्या अगदी जवळ असल्यामुळे त्यांना जास्त धोका असतो. विशेष उपकरणांचा वापर करुन अतिशय सूक्ष्म विच्छेदन करून मज्जातंतू वाचविण्यात आले. ५ तास चाललेली ही शस्त्रक्रिया खरोखरच आव्हानात्मक होती. महिलेच्या आजाराचे वेळीच निदान आणि उपचार झाले नसते तर श्वासोच्छवासाच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागले असते. शस्त्रक्रियेनंतर आता रूग्ण पूर्वीप्रमाणे बोलू लागला असून मोकळा श्वास घेऊ शकतोय. शस्त्रक्रियेनंतर महिलेच्या प्रकृतीत सुधारणा पाहून ६ दिवसांनी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गॅाईटर आढळल्यास त्यास लवकर काढून टाकले पाहिजे. वेळेत शस्त्रक्रिया करणे देखील महत्त्वाचे आहे कारण काहीवेळा, त्यांच्यात कर्करोग विकसित होण्याचा धोका असतो.

थायरॉईड शस्त्रक्रियेच्या क्षेत्रात एक नवीन मानक

लीलावती रूग्णालय आणि रिसर्च सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निरज उत्तमानी यांनी म्हटले की, मानेतून १ किलो वजनाची थायरॅाईड गाठ डॉक्टरांनी यशस्वीरित्या काढून महिलेला नवीन आयुष्य दिले आहे. गाठ काढल्यामुळे महिलेच्या श्वसनासंबंधी समस्या दूर झाल्या आहेत. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे थायरॉईड शस्त्रक्रियेच्या क्षेत्रात एक नवीन मानक स्थापित केली आहे.

रूग्ण प्रिशा शेट्टी म्हणाल्या की, मानेत थायरॉईडची गाठ असल्याने मला श्वास घ्यायला त्रास जाणवत होता. अनेक डॉक्टरांकडून उपचार घेतले. परंतु, प्रकृतीत सुधारणा झाली नाही. मात्र लिलावती रूग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करून मानेतून गाठ यशस्वीरित्य काढून टाकली आहे. या शस्त्रक्रियेनंतर आता मी पुन्हा कुठल्याही अडचणीशिवाय श्वास घेऊ शकतेय. मला नवीन आयुष्य दिल्याबद्दल मी डॉक्टरांचे आभार मानते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news