मुंबई; पुढारी वृत्तसेवा : प्रदेशाध्यक्षपद सांभाळणे म्हणजे कोंबड्या पाळण्याएवढे सोपे नाही, असा टोला राष्ट्रवादीचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समर्थकाने सोशल मीडियावरून आमदार रोहित पवार यांना लगावला.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन नुकताच साजरा झाला. या कार्यक्रमात आणि त्यानंतरही पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे काही जणांचा रोख होता. जयंत पाटील यांनी आता प्रदेशाध्यक्षपद सोडावे तरच येणार्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला भवितव्य राहील, अशा प्रकारचा मेसेज सोशल मीडियावरून फिरत राहिला. शशिकांत शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्यापैकी एकाकडे प्रदेशाध्यक्षपद सोपवावे. दोन्ही नेत्यांनी पक्ष संघटनेची जबाबदारी सांभाळावी, अशा प्रकारचा हा मेसेज होता.
जयंत पाटील यांचे निकटवर्तीय आणि पक्षाचे प्रवक्ते भूषण राऊत यांनी या मेसेजनंतर जोरदार पलटवार केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळणे म्हणजे कोंबड्या पाळण्याइतके सोपे नाही, अशी टीका करत त्यांनी थेट रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला. बारामती अॅग्रोच्या माध्यमातून रोहित पवार यांच्या पोल्ट्रीचाही व्यवसाय आहे. त्या अनुषंगाने ही टीका करण्यात आली.
लोकसभा निवडणुकीत आपल्यामुळेच 8 जागांवर पक्षाचे उमेदवार विजयी झाले, अशी बॅनरबाजी करणार्या जयंत पाटील समर्थकांना रोहित पवार यांनी सुनावल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सोशल मीडियातून वॉर सुरू झाले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच शरद पवार गटात धूमशान सुरू झाल्यामुळे पक्षात जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदावरून काढण्यासाठी जोरदार मोहीम सुरू झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.