ST Strike : एसटी संप फोडण्याच्या हालचालींना वेग

ST Strike : एसटी संप फोडण्याच्या हालचालींना वेग
Published on
Updated on

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : निलंबन, सेवासमाप्तीच्या कारवाईनंतरही संपकरी एसटी (ST Strike) कर्मचारी कामावर हजर होत नसल्यामुळे महामंडळाने आणखी आक्रमक पवित्रा घेतला आहे. महामंडळाने कुटुंब सुरक्षा योजनेंतर्गत नियुक्त केलेल्या कर्मचार्‍यांना त्वरित हजर राहण्याचे आदेश दिले असून, संपकर्‍यांवर बदलीचा बडगाही उगारला आहे.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचार्‍यांनी महिनाभरापासून संप पुकारला आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचार्‍यांना वेतनवाढ जाहीर करून कामावर हजर होण्याचे आवाहन वारंवार केले; मात्र संप सुरूच आहे. त्यामुळे जनतेची गैरसोय कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने कारवाईचा बडगा उगारला असून, कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यास सुरुवात केली आहे. (ST Strike)

बहुतेक एसटी कर्मचारी आपल्या गावाजवळील आगारातच काम करण्यास प्राधान्य देतात. कारण, त्यामुळे त्यांना कुटुंब, शेतीकडे लक्ष देता येते. दूरच्या आगारात बदली झाल्यास त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

एसटी महामंडळाने शनिवारी कर्मचार्‍यांच्या विभागांतर्गत बदल्या केल्या. औरंगाबाद, पुणे, मुंबई, ठाणे, यवतमाळ, अहमदनगर आणि इतर विभागांनी कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. (ST Strike )

सतत गैरहजेरीच्या कारणास्तव बडतर्फ झालेल्या कर्मचार्‍यांना कुटुंब सुरक्षा योजनेंंतर्गत पुन्हा कामावर घेण्यात आले होते. वाजवी कारणाशिवाय गैरहजर राहिल्यास संबंधित कर्मचार्‍याला शिस्त व आवेदन कार्यपद्धतीनुसार बडतर्फ करण्यात येईल, असे नमूद केलेले प्रतिज्ञापत्र त्यावेळी महामंडळाने घेतले होतेे. त्यामुळे अशा कर्मचार्‍यांनी तात्काळ सेवेत हजर व्हावे, असे आदेश एसटी महामंडळाने दिले आहेत. दरम्यान, रविवारी राज्यातील 250 पैकी 70 एसटी आगारांतील वाहतूक सुरू झाली.

कोरोनाकाळात आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचार्‍यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी?

कोरोनाकाळात आर्थिक समस्या आणि अन्य कारणामुळे एसटी महामंडळातील 38 कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्या. अशा कर्मचार्‍यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचा विचार एसटी महामंडळ करत आहे. मात्र, कोरोनाकाळात वेतन उशिरा अथवा कमी मिळाल्याच्या कारणांमुळे आत्महत्या केलेल्या कर्मचार्‍यांच्या वारसांनाच याचा लाभ मिळेल. त्यादृष्टीने एसटी महामंडळाचे अधिकारी आत्महत्या केलेल्या कर्मचार्‍यांबाबत सखोल चौकशी करत आहेत.

कोरोना टाळेबंदीत एसटी वाहतूक ठप्प झाल्यामुळे महामंडळाचे उत्पन्न बुडाले. कमी वेतन, त्यात होणारा विलंब, बँकेचे थकलेले हप्‍ते,घरखर्च,वैद्यकीय खर्च आणि अन्य समस्यांमुळे अनेक कर्मचार्‍यांनी मानसिक तणावातून आत्महत्या केल्या. काही कर्मचार्‍यांनी वैयक्तिक कारणांमुळेही आत्महत्या केल्या. मार्च 2020 ते फेब्रुवारी 2021 पर्यंत 12 आणि मार्चपासून 10 ऑक्टोबरपर्यंत 11 कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्या.

काही दिवसांपूर्वी परिवहन मंत्री अनिल परब यांनी आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचार्‍यांच्या वारसांचा सहानुभूतिपूर्वक विचार करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार अशा कर्मचार्‍यांच्या वारसांना एसटी महामंडळात अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यासाठी चाचपणी सुरू झाली आहे. त्यासाठी संबंधित कर्मचार्‍यांनी आत्महत्या करण्याचे नेमके कारण काय, याची माहिती महामंडळाकडून घेतली जात आहे.

वेतनाशी संबंधित असल्यासच लाभ

कोरोनाकाळात ज्या कर्मचार्‍यांनी वेतन उशिराने मिळणे किंवा संबंधित कारणांमुळे आत्महत्या केली असेल, त्यांच्याच वारसाला नोकरी मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. अन्य कारणांमुळे आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचार्‍यांच्या वारसाला नोकरी मिळणार नाही. याबाबत महामंडळाकडून लवकरच निर्णय जाहीर करण्यात येईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news