मुंबई, पुढारी वृत्तसेवा : हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या अंडरवर्ल्ड गँगस्टर छोटा राजनला गुरुवारी विशेष सीबीआय न्यायालयाने झटका दिला. न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी 'मोका' कायद्याखाली 23 वर्षांनंतर छोटा राजनला दोषी ठरवून जन्मठेप आणि विविध गुन्ह्यांत 16 लाखांचा दंड ठोठावला.
जया शेट्टी यांनी खंडणी देण्यास नकार दिल्यानंतर राजन टोळीच्या गुंडांनी जुलै 2001 मध्ये शेट्टी यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर 15 वर्षांनी राजनला 25 ऑक्टोबर 2015 रोजी इंडोनेशियातील बाली विमानतळावर अटक करून भारतात आणण्यात आणले.
या खटल्याची सुनावणी मागील पाच वर्षे सुरू होती. विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी छोटा राजनच्या सहभागाचे भक्कम पुरावे सादर केले. तसेच एकूण 32 साक्षीदार तपासले.
साक्षीदारांमध्ये जया शेट्टी यांची मुले मोहन आणि मनोहर या दोघांंचा समावेश होता. सरकारी पक्षाने सादर केलेल्या साक्षी-पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने छोटा राजनला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
राजनला 25 ऑक्टोबर 2015 रोजी इंडोनेशियातील बाली विमानतळावर अटक करून भारतात आणले होते. महाराष्ट्रात जवळपास 70 गंभीर गुन्ह्यांत तो आरोपी आहे, तर पत्रकार ज्योतिर्मय ऊर्फ जे. डे यांच्या हत्येप्रकरणी छोटा राजन सध्या दिल्लीतील तिहार तुरुंगात जन्मठेप भोगत आहे. महाराष्ट्र सरकारने खटला चालवण्यासाठी राजनविरोधातील सर्व 70 गुन्हे सीबीआयकडे वर्ग केले आहेत.