राज्यात ओमायक्रॉनचा शिरकाव; लॉकडाऊनवर विजय वडेट्टीवार काय म्हणाले ? | पुढारी

राज्यात ओमायक्रॉनचा शिरकाव; लॉकडाऊनवर विजय वडेट्टीवार काय म्हणाले ?

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा

ओमायक्रॉनचा देशात आणि राज्यात शिरकाव झाल्याने चिंता वाढली असली तरी लगेच लॉकडाऊन लागू करण्याची गरज नाही. राज्य सरकारही तशा प्रयत्नात नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. दरम्यान, देशात ओमायक्रॉनचे रुग्ण सापडल्याने सध्या राज्यातही चिंतेचे वातावरण आहे.

कदाचित पुढच्या काळात कोरोनाची तिसरी लाट ही ओमायक्रॉनची असू शकते; पण ओमायक्रॉन जास्त धोकादायक नसून घाबरण्याचे कारण नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. त्यांनी लॉकडाऊनची लगेच गरज नसल्याचे म्हटले आहे.

लगेच लॉकडाऊनची गरज नसली तरी सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग पसरू नये म्हणून सर्वतोपरी काळजी घेतली जात असल्याचेही विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

सर्वांनी लस घेण्याचे आवाहन

राज्यात यंत्रणा सतर्क करण्यात आली असल्याचे सांगताना जनतेने कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे आणि सर्वांनी लस घ्यावी, असे आवाहन टोपे यांनी केले.

निर्बंधाची कारवाई जाचक होईल

ओमायक्रॉनमुळे संसर्गाची भीती वाटत असली तरी घाबरण्याचे कारण नाही. यावर लगेच निर्बंधाची कारवाई करणे लोकांना जाचक आणि त्रासदायक होईल. त्यामुळे लगेच निर्बंधाची आवश्यकताही नाही. मात्र, सावधगिरी आवश्यक आहे. लोकांनी आपल्या पातळीवर काळजी घेतली पाहिजे, असे मंत्री टोपे यांनी सांगितले.

Back to top button