पाच वर्षांत जेवणाची थाळी 71 टक्क्यांनी महागली

पाच वर्षांत जेवणाची थाळी 71 टक्क्यांनी महागली

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : 'महंगाई डायन खाई जात है' या गाण्याची पुरेपूर प्रचिती महाराष्ट्रातील सामान्यांना येत असल्याचे एका अहवालावरून स्पष्ट झाले आहे. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात शाकाहारी थाळीची सरासरी किंमत तब्बल 71 टक्क्यांनी वाढली असून, त्या तुलनेत नोकरीच्या माध्यमातून मिळणारे मासिक वेतन मात्र केवळ 37 टक्क्यांनी वाढल्याचे हा अहवाल सांगतो.

रोजंदारीवर काम करणार्‍या कुटुंबांसाठी अन्नावर होणारा खर्च आधीच जास्त असताना, आता त्यात आणखी वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे. अन्नाच्या वाढत्या किमतीचा विचार करता, रोजंदारीवर काम करणार्‍यांची मजुरी उपरोक्त कालावधीत 67 टक्क्यांनी वाढल्याचे दिसते. हे मजूर आधीच त्यांच्या मासिक वेतनाचा मोठा हिस्सा (20 टक्क्यांहून अधिक) अन्नावर खर्च करत होते, असे यावरून स्पष्ट होते.

सरासरी भारतीय कुटुंबाने दररोज दोन थाळी पौष्टिक अन्न, नाश्ता, दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण घेतल्यास त्यांच्या आहाराच्या गरजा पूर्ण होतात, असे या विश्लेषणासाठी गृहीत धरण्यात आले. यात केवळ शाकाहारी जेवणाचा विचार केला गेला. सातत्यपूर्ण डेटा उपलब्ध असल्याने या विश्लेषणासाठी महाराष्ट्राची उदाहरण म्हणून निवड केली गेली. देशात अन्यत्रही सरासरी हीच स्थिती असण्याची शक्यता आहे. वाढती महागाई आणि कुटुंबाचे उत्पन्न यांचा विचार हे विश्लेषण करताना केला गेला.

दोन थाळींची सरासरी किंमत काढण्यासाठी महाराष्ट्रात नियमित जेवणात वापरले जाणारे तांदूळ, तूरडाळ, कांदा, लसूण, हिरवी मिरची, आले, टोमॅटो, बटाटा, वाटाणा, आटा, कोबी, सूर्यफूल तेल आणि मीठ या पदार्थांचा विचार केला गेला. यातील काही पदार्थांच्या किमती ग्राहक व्यवहार मंत्रालय आणि राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाकडून घेण्यात आल्या; तर भाज्यांच्या बाबतीत सरासरी अंदाजित किमती मान्य केल्या गेल्या. 2019 आणि 2023 या वर्षांचा विचार करता दोन थाळींसाठी लागणार्‍या 125 ग्रॅम तूरडाळीचा दर गेल्या पाच वर्षार्ंत 9.3 रुपयांवरून 20.1 रुपयांवर गेला असून, 300 ग्रॅम बटाट्याचा दर 6.8 वरून 8.6 रुपये झाला आहे; तर दोन थाळींचे अन्न बनविण्याचा खर्च 2019 मध्ये 46.2 रुपये होता. तो गेल्यावर्षी (2023) 64.2 रुपये, तर यंदा 79.2 रुपयांवर गेल्याचे हे विश्लेषण सांगते. थोडक्यात, महाराष्ट्रात दर महिन्याला एका घरात दोन थाळी बनवण्याचा खर्च 2019 मध्ये 1,386 रुपये होता. तो 2024 मध्ये 2,377 रुपयांवर पोहोचला आहे.

पगाराची वाढ किरकोळ

महाराष्ट्रात रोजंदारीवर काम करणार्‍यांची दिवसाची मजुरी 2019 मध्ये 218 रुपये होती. ती 2024 मध्ये 365 रुपये झाली आहे; तर नियमित पगारदारांच्या बाबतीत 2019 मध्ये असलेले 17,189 रुपये सरासरी मासिक वेतन यंदा (2024) 23,549 रुपयांवर पोहोचले आहे.

पगार व खर्च यांच्यातील या असमानतेचा अर्थ असा आहे की, नियमित पगारदार मंडळी असलेल्या कुटुंबांचा अनावश्यक वस्तू व लक्झरी उत्पादनांवरील खर्च कमी असेल; तर रोजंदारीवर काम करणार्‍या कुटुंबांसाठी अन्नावरील खर्चच अधिक असल्याने (आता तोही वाढला आहे) त्यांना तर अनावश्यक वस्तू व लक्झरी उत्पादनांवर खर्च करणे जवळपास अशक्य आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news