कोल्हापूरच्या तीन विधानसभा मतदारसंघांत सर्वाधिक मतदान | पुढारी

कोल्हापूरच्या तीन विधानसभा मतदारसंघांत सर्वाधिक मतदान

प्रमोद चुंचूवार

मुंबई ः राज्यातील लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या टक्केवारीचा 288 विधानसभा मतदारसंघनिहाय तुलनात्मक अभ्यास केला असता, सर्वाधिक मतदान झालेल्या पहिल्या पाच लोकसभा मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघ हे कोल्हापूर जिल्ह्याचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले असून, कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, हातकणंगले आणि कागल या विधानसभा मतदारसंघांचा सर्वाधिक मतदान झालेल्या मतदारसंघांमध्ये समावेश आहे.

राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांपैकी केवळ एका मतदारसंघात 80 टक्क्यांहून अधिक मतदान झाले. 70 ते 80 टक्के मतदान 35 विधानसभा मतदारसंघांत झाले. 60 ते 70 टक्के मतदान 139, 50 ते 60 टक्के मतदान 103 तर 40 ते 50 टक्के मतदान 10 विधानसभा मतदारसंघांत झाले.

नवापूरमध्ये सर्वाधिक, करवीर दुसर्‍या क्रमांकावर

नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील शिरीषकुमार नाईक यांच्या नवापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 80.18 टक्के मतदान झाले. पी. एन. पाटील यांच्या करवीर विधानसभा मतदारसंघात 79.61 टक्के असे दुसर्‍या क्रमांकाचे सर्वाधिक, तर तिसर्‍या क्रमांकावर दिंडोरी विधानसभा मतदारसंघात 75.42 टक्के इतके मतदान झाले. राजू आवळे यांच्या हातकणंगलेत 75.32 टक्के, हसन मुश्रीफ यांच्या कागलमध्ये 75.31 टक्के मतदान झाले.

 मुंबई-ठाण्यात नीचांकी विधानसभांची संख्या अधिक

राज्यात सर्वात कमी 43.68 टक्के मतदान मंत्रालय, विधान भवन यांचा समावेश होणार्‍या भाजपचे राहुल नार्वेकर यांच्या कुलाबा विधानसभा मतदारसंघात झाले. त्यापेक्षा अधिक 47.07 टक्के ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ या शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांच्या मतदारसंघात झाले.

सर्वाधिक मतदान झालेले विधानसभा मतदारसंघ
नवापूर : 80.18
करवीर : 79.61
दिंडोरी : 75.42
हातकणंगले : 75.32
कागल : 75.31

Back to top button