

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर विदेशातून महाराष्ट्रात आलेल्या प्रवाशांसाठी राज्य सरकारने लागू केलेल्या नियमावलीचा (corona Guidelines) फेरविचार करावा, अशा आशयाच्या सूचना केंद्राने केल्या आहेत. तसेच ही नियमावली 2 डिसेंबरनंतर प्रवासास निघालेल्या प्रवाशांनाच लागू करावी, असेही स्पष्ट केले आहे.
विदेशातून भारतात येणार्या सर्वच प्रवाशांनी आपल्या प्रवासाची योजना आधीच निश्चित केलेली असते. त्यांना राज्य सरकारने घातलेल्या अटींची माहिती मिळालेली नसते. विमानतळावर उतरल्यानंतर अचानक त्यांना नवे नियम लागू केल्यास त्यांची अडचण होऊ शकते. त्यामुळे ही नियमावली 2 डिसेंबरनंतरच लागू करावी. तत्पूर्वी जे प्रवासी विमानतळावर उतरतील त्यांची आरटीपीसीआर चाचणी करून ते निगेटिव्ह असतील तर त्यांना जावू द्यावे, असेही केंद्राने राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.
ओमायक्रॉन विषाणू आढळलेल्या देशांतून भारतात येणार्या प्रवाशांना 7 दिवसांचे संस्थात्मक विलगीकरण महाराष्ट्र सरकारने सक्तीचे केले आहे. अशा प्रवाशांना हॉटेलमध्ये ठेवले जाणार असून, यासाठीचे शुल्क प्रवाशांनीच भरायचे आहे.
जोखमीच्या देशांतून आलेले 5 जण बाधित (corona Guidelines)
आफ्रिका तसेच इतर जोखमीच्या देशातून आलेले आणखी 4 प्रवासी कोविड बाधित आढळलेले आहेत. त्यामुळे मुंबईत अशा कोविड रुग्णांची संख्या पाच वर गेली आहे. मुंबई, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर आणि पुणे या भागात आफ्रिका आणि इतर जोखमीच्या देशातून आलेला प्रत्येकी एक प्रवासी कोविड बाधित आढळला होता. या प्रवाशांचे प्रयोगशाळा नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात आले आहेत अशी माहिती यापूर्वीच राज्य आरोग्य विभागाने दिलेली होती.
'ओमायक्रॉन'चा 23 देशांत शिरकाव
जीनिव्हा ; वृत्तसंस्था : कोरोना विषाणूचा 'ओमायक्रॉन' हा नवा व्हेरियंट जगभरात वेगाने फैलावतो आहे. बोत्सवानापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेत आढळल्यानंतर एका आठवड्यातच या व्हेरियंटने 23 देशांत शिरकाव केला आहे.
आतापर्यंत 30 हून अधिक देशांनी प्रवासावरील निर्बंधांसह आपापल्या सीमाही सील केल्या आहेत. बोत्सवाना, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, बेल्जियम, कॅनडा, झेक गणराज्य, डेन्मार्क, जर्मनी, हाँगकाँग, इस्रायल, इटली, जपान, नेदरलँड, नायजेरिया, पोर्तुगाल, सौदी अरेबिया, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, ब्रिटन आदी देशांतून नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत. बुधवारी दक्षिण कोरियातही या व्हेरियंटचे 5 रुग्ण आढळून आले. पाचही जण नायजेरियातून येथे आलेले आहेत. अंगोला, इथिओपिया, झाम्बिया या देशांतूनही नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत.
चीनने आधीच आपल्या सीमांवर कडक निर्बंध लादले आहेत, तर हाँगकाँगने ओमायक्रॉनचे रुग्ण आढळलेल्या देशांवर प्रवासबंदी घातली आहे.