सगळे त्यांनीच उभे केले, मग 32 वर्षे मी काय केले? : अजित पवार | पुढारी

सगळे त्यांनीच उभे केले, मग 32 वर्षे मी काय केले? : अजित पवार

बारामती : पुढारी वृत्तसेवा : शुक्रवारी महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सभेत ‘बारामतीच्या संस्था शरद पवार यांनी उभ्या केल्या’, असे सांगणार्‍या युगेंद्र पवार यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाचार घेतला. ‘सगळे त्यांनीच उभे केले; मग 32 वर्षे मी काय करीत होतो?’ असा सवाल अजित पवार यांनी केला. शिवाय त्यांना आत्तापासूनच आमदारकीची स्वप्ने पडू लागल्याचा टोला त्यांनी लगावला.

युगेंद्र पवार यांचा नामोल्लेख न करता ते म्हणाले, मी खासदार झाल्यावर यांचा जन्म झाला आणि हे सांगताहेत की, बारामतीच्या सर्व संस्था शरद पवार यांनी उभ्या केल्या. मग आम्ही 30-32 वर्षे काय केले?

इंदापूर : लोकसभा निवडणूक झाली की विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीत जे ठरेल ते मी पाळेन. मी शब्दाचा पक्का आहे, असा माझा शब्द असून महायुतीचा उमेदवार निवडून द्या. पाच वर्षांत यापेक्षा अधिक निधी आणू, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर येथील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात केले. इंदापुरात मी निधी द्यायला कमी पडणार नाही. मात्र, तुम्हीही घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन कचाकचाकचा दाबा, असे ग्रामीण भाषेत बोललो. तेच पुण्यात असतो तर तिथे असा शब्दप्रयोग वापरला नसता. जिथे जी भाषा चालते त्याच भाषेत बोलावे लागते, असे पवार म्हणाले.

पाटलांच्या घरी पवारांचे सहकुटुंब स्नेहभोजन

अजित पवार यांनी भाजपचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन केले. सुनेत्रा पवार, पुत्र पार्थ आणि जय यांनी व हर्षवर्धन पाटील यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील, कन्या अंकिता पाटील ठाकरे, निहार ठाकरे व राजवर्धन पाटील हेदेखील स्नेहभोजनप्रसंगी सहभागी झाले होते.

Back to top button