मुंबई : पोलीस राहत असलेल्या फ्लॅटची चक्क परस्पर विक्री | पुढारी

मुंबई : पोलीस राहत असलेल्या फ्लॅटची चक्क परस्पर विक्री

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  फ्लॅटच्या आमिषाने एका कलादिग्दर्शकाची एका टोळीने सुमारे तीस लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी मुख्य आरोपीसह अकराजणांविरुद्ध काळाचौकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या 

सुरेश रामभाऊ गायकवाड, कुसुम रामभाऊ गायकवाड, देवीदयाल सोहनलाल गुप्ता, नलिनी सूर्यकांत बोराडे, राजेश सूर्यकांत बोराडे, योगेश सूर्यकांत बोराडे, भुपेंद्र सूर्यकांत बोराडे, निर्मला चंद्रप्रकाश बोराडे बोराडे, देवेंद्र चंद्रप्रकाश बोराडे, अरुणा संतोष कांदेकर आणि करुणा विजयसिंह पर्बत अशी या अकरा जणांची नावे आहेत. या टोळीने पोलीस कुटुंबीय राहत असलेल्या इमारतीच्या दहाहून अधिक फ्लॅटची विक्री करुन कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

माहीम येथे राहणारे तक्रारदार कलादिग्दर्शक आहे. गेल्या वर्षी त्यांची देवीदयालशी ओळख झाली होती. सुरेश गायकवाड याच्या कॉटनग्रीन परिसरातील लक्ष्मी इमारतीमधील काही फ्लॅटची विक्री करायची असल्याचे सांगितले. त्यांची ओळख सुरेशशी करुन दिली. सुरेशने दोन फ्लॅट दाखविले. त्यापैकी एक फ्लॅट तीस लाखांमध्ये घेण्याचे त्यांनी ठरवले. जुलै 2023 रोजी सुरेशला तीस लाखांचे पेमेंटही केले होते.

कराराच्या वेळेस त्यांना इतर आरोपींनी फ्लॅटचे बोगस रिलीज डिड आणि पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी कागदपत्रे दाखविली. मात्र तीन महिने उलटूनही सुरेशने त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही. ते तिथे पुन्हा चौकशीसाठी गेले असता त्यांना सुरेशच्या कार्यालयाला टाळे दिसले. शिवाय इमारतीची जागा बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या मालकीची असून सध्या त्या जागेचा ताबा मुंबई पोलिसांकडे असल्याचे स्पष्ट झाले.

Back to top button