Piyush Goyal : मच्छीमारांच्या वस्तीत नाकाला रुमाल लावल्यामुळे गोयलांवर काँग्रेसची टीका | पुढारी

Piyush Goyal : मच्छीमारांच्या वस्तीत नाकाला रुमाल लावल्यामुळे गोयलांवर काँग्रेसची टीका

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले भाजपाचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल ( Piyush Goyal ) यांनी त्यांच्या मतदारसंघातील कोळीवाड्यातील भेटी दरम्यान माशांचा वास सहन न झाल्याने नाकाला रूमाल लावल्याने त्यांच्यावर काँग्रेस पक्षाने टीकेची झोड उठवली आहे.

संबंधित बातम्या 

बोरिवलीतील बाभई आणि वझिरा या गावठाणांमध्ये प्रचार सुरू असताना गोयल ( Piyush Goyal ) यांनी मच्छीचा वास सहन न झाल्याने या प्रचार यात्रेच्या दरम्यान नाकाला रुमाल लावूनच प्रचार केला. मात्र त्यांचे हे वर्तन स्थानिक मच्छीमारांना अपमानास्पद वाटले. आमच्या समस्यांबद्दल जाणून घेण्याऐवजी आमच्या मासळीच्या वासाचा तिटकारा करत असतील तर त्यांना कशासाठी मतदान करायचे, असा सवाल येथील मच्छिमारांनी उपस्थित केला आहे.

काँग्रेसतर्फे निषेध व टीका

काँग्रेसचे प्रवक्ते व स्टार प्रचारक सचिन सावंत यांनी गोयल यांचा निषेध नोंदवून गोयल यांना पराभूत करण्याचे आवाहन मतदारांना केले आहे. नाकाला रुमाल लावून फिरणारे पीयुष गोयल हे गोरगरीब जनतेचे प्रतिनिधी होऊच शकत नाहीत. धारावीतील रहिवाशांना खारजमीनीवर पाठविण्याचे नियोजन महायुतीचे आहे. कदाचित आता ही गावठाणेही व कोळी बांधवांनाही खारजमिनीवर पाठवण्याचे त्यांच्या मनात असेल.

गावठाणात राहणारे कोळी बांधव हे मुंबईतील प्रथम नागरीक आहेत. कोळी बांधव हे आमच्या संस्कृतीचा व मासे ही मुंबईच्या खाद्य संस्कृतीचा भाग आहेत. झोपडपट्टीवासियांसहित माझ्या कोळी बांधवांचा तिरस्कार करणार्‍या या व्यक्तीला उत्तर मुंबईतील जनता धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही, अशा शब्दात सावंत यांनी माध्यमांशी बोलताना गोयल यांच्यावर टीका केली.

आरोप करायला टॅक्स लागत नाही- गोयल

काँग्रेसच्या आरोपावर बोलताना गोयल यांनी काँग्रेसवर टीका करतानाच आपण नाकाला रूमाल लावल्याचा आरोप अप्रत्यक्षपणे मान्यही केला. काँग्रेसला आरोप करायला टॅक्स लागत नाही. मोदी सरकारने मच्छिमारांच्या कल्याणासाठी भरपूर काम केले आहे, असे गोयल म्हणाले. राज्यातील मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांचे जोरदार समर्थन केले. गोयल हे शाकाहारी आहेत त्यामुळे त्यांना माशाचा वास सहन झाला नसणे व त्यांनी नाकाला रूमाल लावणे हे स्वाभाविक आहे. आपण हे समजून घ्यायला हवे. याचा अर्थ ते मासेमारांचे प्रश्न सोडवणार नाहीत,असे नव्हे, असे केसरकर म्हणाले.

Back to top button