एसटी महामंडळाची 10 टक्के हंगामी भाडेवाढ? | पुढारी

एसटी महामंडळाची 10 टक्के हंगामी भाडेवाढ?

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : महसूल वाढीच्या दृष्टीने परिवर्तनशील हंगामी भाडेवाढ सूत्रानुसार एसटीने उन्हाळी हंगामात आपल्या सर्व प्रकारच्या बसच्या तिकीट दरात सरसकट 10 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्ताव महामंडळाने तयार करून तो मंजुरीसाठी राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठविला आहे. 15 एप्रिल ते 15 जूनदरम्यान ही हंगामी भाडेवाढ असणार आहे. दरवर्षी दिवाळीत अशा पद्धतीने हंगामी 10 टक्के भाडेवाढ केली जाते.

संबंधित बातम्या 

उन्हाळी सुट्टीत मूळ गावी, पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक प्रवास करतात. शालेय विद्यार्थ्यांना आता उन्हाळी सुट्टी सुरू झाली आहे. 10 एप्रिलपासून उन्हाळी हंगाम सुरू झाला आहे. राज्याच्या कानाकोपर्‍यात एसटी धावते. सध्या 13 हजार एसटीच्या माध्यमातून दिवसभरात सुमारे 55 लाख प्रवासी एसटीने प्रवास करतात. उन्हाळी सुट्टीत प्रवाशांची जास्त गर्दी होते. एसटीच्या प्रवासाला नागरिक प्राधान्य देतात. या प्रवासी गर्दीतून महसूल वाढीसाठी महामंडळाने 10 टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे.

हंगामी भाडेवाढ करण्यासाठी राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरी आवश्यक आहे. त्यामुळे हा प्रस्ताव परवानगीसाठी राज्य परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. परंतु लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने परिवहन प्राधिकरणाने निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन महामंडळाला प्रस्ताव पुन्हा पाठविण्यास सांगितल्याचे एसटीतील वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले.

Back to top button