सलमानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरण; विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल | पुढारी

सलमानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरण; विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घरावर रविवारी सकाळी अज्ञातांनी केलेल्या गोळीबाराचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले. या प्रकरणावरून विरोधकांनी राज्य सरकारला लक्ष्य केले. राज्यात कायदा व सुव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याची टीका शिवसेना (ठाकरे गटाचे) खा.संजय राऊत यांनी केली, तर ट्रिपल इंजिन सरकारमधील कोणाचा तरी आशीर्वाद असल्याशिवाय हे होऊ शकणार नाही, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

संबंधित बातम्या 

दरम्यान, या सर्व प्रकरणानंतर गुन्हेगारांना पाठीशी घालण्यात येणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर पहाटे रविवारी दोन अज्ञात बाईकस्वारांनी गोळीबार केला. बिश्नोई टोळीच्या गुंडांनी या गोळीबारीची जबाबदारी स्वीकारली आहे. विशेष म्हणजे राजस्थान येथील हरीण, काळवीट शिकार प्रकरणापासून सलमान हा बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवर आहे. दरम्यान, या घटनेवरून विरोधकांनी राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. भरवस्तीत हा गोळीबार झाला असून भर रस्त्यावर गोळीबार होत असेल तर अब की बार गोळीबार सरकार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

सरकारमध्ये कोणाचा तरी गुन्हेगारीला आशीर्वाद आहे त्याशिवाय हे कसे शक्य आहे, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी केला. तर, हा केवळ इशारा नाही तर या बंदुकीच्या गोळ्यांनी भाजप सरकारची पोलखोल केली आहे. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत, पण त्यांचे काम हे विरोधकांवर खोटे गुन्हे लावणे हेच आहे. पोलीस आयुक्त काय करत आहेत, असा सवालही राऊतांनी केला आहे.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी सायंकाळी सलमान खानची त्यांच्या निवासस्थानी जाऊन विचारपूस केली. शिंदे गटाने राहुल कनवाल यांनीही सलमानची भेट घेतली. देवाच्या कृपेने सर्व ठीक आहे, पण सलमान भाईला अशा गोष्टींनी फरक पडत नाही, असेही कनवाल यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांची पोलीस आयुक्तांशी चर्चा, सलमान खानलाही केला फोन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराची घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात आपण स्वत: पोलीस आयुक्तांशी चर्चा केली आहे. सलमान खानसोबतही बोलणे केले असून त्यांना दिलासा आहे. कायदा हातात घेणार्‍यांना पाठीशी घातले जाणार नाही. पोलीस कडक कारवाई करतील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तर, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पोलीस तपास करत असून योग्यवेळी याबाबतची माहिती दिली जाईल,असे सांगितले.

Back to top button