Lok Sabha Election 2024 उत्तर पश्चिम मुंबईत 'महायुती' चा उमेदवार अद्याप अनिश्चित | पुढारी

Lok Sabha Election 2024 उत्तर पश्चिम मुंबईत 'महायुती' चा उमेदवार अद्याप अनिश्चित

राजन शेलार

मुंबईतील सहा लोकसभा मतदार संघापैकी महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष चार मतदार संघात निवडणूक लढवणार, हे निश्चित झाले आहे. त्यापैकी उपनगरातील उत्तर पश्चिम मुंबई हा एक मतदारसंघ आहे. 2014 पासून दोन वेळा या मतदार संघावर शिवसेनेने आपला भगवा फडकवला आहे. गजानन कीर्तीकर हे येथील विद्यमान खासदार आहेत. परंतु, पक्षातील बंडखोरीनंतर कीर्तीकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले आहेत. त्यामुळे शिवसेनेने (ठाकरे) पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या कीर्तीकर यांच्या मुलाला म्हणजेच अमोल कीर्तीकर यांना उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. मात्र, अमोल कीर्तीकर यांना टक्कर देणारा उमेदवारच महायुतीला अद्याप सापडलेला नसल्याने येथील मतदारही संभ्रमात पडले आहेत.

शिवसेनेतील बंडाळीनंतर राज्यात घडलेल्या सत्ता संघर्षानंतर प्रथमच महायुती आणि महाविकास आघाडी लोकसभेच्या निमित्ताने निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे अनेक मतदार संघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. असाच संघर्ष उत्तर पश्चिम मतदार संघात पाहायला मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर शिवसेनेचे अनेक खासदार, आमदार त्यांच्यासोबत गेले. उत्तर पश्चिम मुंबईचे विद्यमान खासदार गजानन कीर्तीकरही शिंदेसोबत गेले. तर त्यांचे पुत्र, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते, युवासेनेचे सरचिटणीस अमोल कीर्तीकर हे आपल्या वडिलांसोबत शिंदे यांच्या पक्षात न जाता त्यांनी एकनिष्ठ म्हणून ठाकरेंसोबतच राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या अमोल यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी देत त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. वडील मुख्यमंत्री शिंदेसोबत तर मुलगा ठाकरेंसोबत… त्यामुळे पिता-पुत्रामध्येच निवडणुकीचा संघर्ष पाहायला मिळणार का, अशी चर्चा येथे रंगली होती. मात्र, पुत्राला ठाकरेंकडून उमेदवारी मिळताच गजानन कीर्तीकर यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पिता-पुत्रामधील थेट संघर्ष टळला गेला. अमोल कीर्तीकर यांची ‘ईडी’ने चौकशी सुरू केली असून, गजानन कीर्तीकर यांनी आता आपल्याच मुलाविरोधात प्रचार करण्याची घोषणा केली आहे. मात्र, मनापासून ते खरोखरच मनापासून प्रचार करणार का, हा प्रश्नच आहे.

उत्तर पश्चिम मतदारसंघ गेल्या काही वर्षांपासून विशेषत: काँग्रेसचे सुनील दत्त यांचे युग संपल्यानंतर हा मतदारसंघ शिवसेना-भाजपचा गड झाला आहे. 2014 मध्ये शिवसेना-भाजपची युती असताना शिवसेना नेते गजानन कीर्तीकर यांना येथून उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी कीर्तीकर यांनी काँग्रेस नेते गुरुदास कामत यांचा 1 लाख 83 हजार 28 इतक्या मतांनी पराभव केला. कीर्तीकर यांना त्यावेळी 4 लाख 64 हजार 820, तर कामत यांना 2 लाख 81 हजार 792 मते मिळाली होती. त्यानंतर कीर्तीकर हे पुन्हा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. त्यावेळी त्यांनी काँग्रेसचे संजय निरूपम यांना पराभवाची धूळ चारली. निरूपम यांना 3 लाख 9 हजार 735 मते, तर कीर्तीकर यांना 5 लाख 7 हजार 63 मते मिळून पुन्हा भगवा फडकवला.

कीर्तीकर यांनी उमेदवारी नको असे सांगितले असले, तरी हा मतदारसंघ महायुतीतील कोणता पक्ष येथून निवडणूक लढवणार, यावर अजूनही शिक्कामोर्तब झालेले नाही. उत्तर पश्चिम येथून शिंदे यांची शिवसेना निवडणूक लढविणार असल्याची चर्चा होती. मात्र, ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्याविरोधात सक्षम असा उमेदवार त्यांना सापडलेला नाही. राज्यभरातील निवडणुकीमुळे राजकीय प्रचाराला जोर चढला असला, तरी येथे मात्र अद्यापही कमालीची शांतता आहे. त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सिनेअभिनेता गोविंदा याला येथून उमेदवारी देण्याबाबत शिंदे गटात चर्चा होती. गोविंदा यांना 2004 मध्ये उत्तर मुंबईतून काँग्रेसने उमेदवारी देत भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. सिनेसृष्टीत त्यावेळेला गोविंदाची क्रेझ होती. त्यामुळे मतदारांवर जादूई भुरळ पाडत गोविंदाने राम नाईक यांचा पराभव करून दिल्ली गाठली होती. आता एक दशकानंतर गोविंदाने पुन्हा राजकारणात पाऊल टाकले असून, त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र, अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात गोविंदाला उमेदवारी दिल्यास ‘हिरो नंबर वन’ कोण ठरणार, हे मतदारच ठरवतील.

ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्याकडे उत्तम संघटन कौशल्य, मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे. उत्तम रणनीतीकार म्हणून त्यांची ओळख आहे. ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. उमेदवारी घोषित केल्यापासून त्यांनी आपल्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे.

उत्तर पश्चिम मुंबई हा मतदारसंघ विविध जाती-धर्मांच्या लोकांनी वसलेला आहे. मराठा, उत्तर भारतीय तसेच मुस्लिमांची संख्या सर्वाधिक आहे. या मतदार संघाची रचना पाहिल्यास सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. यामध्ये जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पूर्व आणि अंधेरी पश्चिम असे सहा मतदारसंघ आहेत. गोरेगावमध्ये विद्या ठाकूर, वर्सोवा येथे भारती लव्हेकर आणि अंधेरी पश्चिम येथून अमित साटम हे भाजपचे आमदार आहेत. तर जोगेश्वरी पूर्व येथे शिवसेनेचे रवींद्र वायकर, दिंडोशीत सुनील प्रभू आणि अंधेरी पूर्वमध्ये रमेश लटके असे तिन्ही शिवसेनेचे आमदार आहेत. दरम्यान, रमेश लटके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके या विजयी झाल्या. तर रवींद्र वायकर यांनी दोन महिन्यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. वायकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली असली, तर तेथील मतदार आणि शिवसैनिक मात्र ठाकरेंसोबतच राहिले आहेत.

कोळीवाडे, झोपडपट्ट्यांचे प्रश्न ऐरणीवर

गेल्या काही वर्षांमध्ये हा मतदारसंघ पायाभूत प्रकल्पांमुळे खूपच चर्चेत आहे. मेट्रो, नवे रस्ते, उड्डाणपूल, बांधकाम असे प्रकल्प विविध भागांत सुरू आहेत. वर्सोवा आणि आसपास असणार्‍या मच्छिमार वस्ती, कोळीवाडे, झोपडपट्टी आदी मूलभूत गोष्टींच्या विकासाचे प्रश्न आणि कोळी बांधवांचे प्रश्न ऐरणीवर आहेत. मात्र, त्यांच्या प्रश्नांकडे म्हणावे तसे कोणी फारसे लक्ष दिलेले नाही. विशेष म्हणजे गोरेगाव हा मुंबईतील इंडस्ट्रियल हब म्हणून ओळखला जातो. अनेक मोठमोठ्या कंपन्या, कार्यालये, फॅक्टरी, छोटे उद्योग येथे आहेत. सिनेसृष्टीतील सर्वात मोठी चित्रनगरी या मतदार संघातच येते. मराठी व हिंदी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार मंडळी अंधेरी, वर्सोवा, गोरेगाव येथे राहतात. त्यामुळे चित्रनगरीतील सोयीसुविधा तसेच येथील पर्यटन अजूनही कागदावरच आहेत. विशेष म्हणजे मुंबईचे फुफ्फुस समजले जाणारे आणि मुुंबईसारख्या शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले ‘आरेचे जंगल’ याच मतदार संघात आहे. त्यामुळे उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघ हा नेहमीच चर्चेत असतो.

Back to top button