नाना पटोले यांच्या अपघाताची सखोल चौकशी करा : अतुल लोंढे | पुढारी

नाना पटोले यांच्या अपघाताची सखोल चौकशी करा : अतुल लोंढे

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्यातील प्रचार दौ-यावर असताना मंगळवारी (दि.९) रात्री कारदा गावाजवळ एका ट्रकने त्यांच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न केला. ही अत्यंत गंभीर घटना असून नाना पटोले यांचा घातपात करण्याचा डाव होता का ? अशी शंका असून या घटनेची सखोल चौकशी करावी, तसेच नाना पटोले यांच्यासह काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची सुरक्षा वाढवावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला तसेच निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात अतुल लोंढे म्हणतात की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले हे ९ एप्रिलला लोकसभा निवडणुकीचा भंडारा जिल्ह्यातील प्रचार संपवून साकोली गावाकडे गाडीने जात असताना त्यांच्या गाडीला ट्रकने चिरडण्याचा प्रयत्न केला. नाना पटोले हे काँग्रेस पक्षाचे महत्वाचे नेते आहेत. त्यामुळे या प्रकरणाकडे त्वरित लक्ष देऊन या घटनेची सखोल चौकशी करावी, लोकसभेच्या निवडणूक प्रचारासाठी नाना पटोले यांना राज्यभर दौरे करावे लागणार आहेत. भंडारा जिल्ह्यातील घटना पाहता भविष्यात पुन्हा असा प्रकार घडू नये, याची खबरदारी घेत नाना पटोले यांच्यासह काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची सुरक्षा वाढवावी, असे अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :

Back to top button