मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा | पुढारी

मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मंगळवारी शिवतीर्थावर झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यात केली. या निवडणुकीच्या रिंगणात मनसे उतरणार नाही, असे सूचित करताना विधानसभेच्या तयारीला लागा, असे आवाहन त्यांनी मनसैनिकांना केले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी राज ठाकरे गेल्या महिन्यात दिल्लीवारी करून आले. तेव्हापासून लोकसभा निवडणुकीत मनसेची भूमिका काय राहील, महायुतीच्या सोबत मनसे जाईल का, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. ती राज ठाकरे यांनीच आपल्या गुढीपाडवा मेळाव्यात छोटेखानी भाषण करून संपवली आणि निवडणूक न लढवता मनसे महायुतीमध्ये दाखल झाली.

येणारी निवडणूक देशाचे भविष्य ठरविणारी आहे. देश खड्ड्यात जाईल की प्रगतीच्या वाटेवर हे ठरविणारी ही निवडणूक आहे. वाटाघाटी मला करता येत नाहीत. तो माझा पिंड नाही. राज्यसभाही नको आणि विधान परिषदही नको. माझ्या काहीही अपेक्षा नाहीत. या देशाला आत्ता खंबीर नेतृत्वाची गरज आहे. फक्त नरेंद्र मोदींसाठी मी भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे, अशी घोषणा राज यांनी केली.

महायुतीच्या दिशेने कसा झाला प्रवास?

महायुतीच्या पाठिंब्याच्या दिशेने झालेला प्रवास सांगताना राज म्हणाले, दीड वर्षापासून एकत्र आलं पाहिजे, असे सुरू होते. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटले. म्हणाले, आपण एकत्र काम करायला हवे. देवेंद्र फडणवीस भेटले. तेही म्हणाले, एकत्र काम करायला हवे. मी म्हणालो, एकत्र काम करायचे म्हणजे काय करायचे? हे राज्यात स्पष्ट होत नव्हते. त्यामुळे मी अमित शहा यांना फोन केला व दिल्लीत जाऊन त्यांना भेटलो. यानंतर जागावाटपाची चर्चा झाली. अशा चर्चेस मी शेवटचा बसलो 1995 साली. त्यामुळे माझा जागावाटपाच्या चर्चेचा पिंड नाही. दोन तू घे – मी दोन घेतो… मी इकडे सरकवतो, तू तिकडे सरकव, अशा चर्चा मला जमत नाहीत. त्यामुळे मी सांगितले मला काहीही नको. माझा बिनशर्त पाठिंबा आहे.

अमित शहांच्या भेटीनंतर जे चक्र सुरू झाले. ‘आज मला असे वाटते’ वाल्या चॅनेल्सनी दे ठोकून बातमी देणे सुरू केले. चर्चेत केवळ अमित शहा आणि मी होतो. तुम्हाला कुठून कळलं? दिल्लीला आदल्या दिवशी पोहोचलो तर राज ठाकरेंना बारा तास थांबायची वेळ आली, अशा बातम्या चालल्या. अरे गधड्या, भेट दुसर्‍या दिवशीची ठरली होती, अशा तिखट शब्दांत राज यांनी माध्यमांवर तोंडसुख घेतले.

राजकीय व्यभिचाराला राजमान्यता नको

पक्षांची फोडाफोडी करण्याच्या प्रवृत्तीवर राज यांनी धावती टीका केली. आज हाणामार्‍या सुरू आहेत. विधानसभेत तर कोथळे काढतील. कॅरम चुकीचा फुटला आहे, त्यामुळे कोणती सोंगटी कोणत्या भोकात आहे, हे कळत नाही. माणूस आला की विचारावं लागतं, कोणत्या पक्षात आहे. या स्थितीत आपल्याला योग्य मार्ग शोधायचा आहे. मनसे महाराष्ट्राला योग्य मार्ग दाखवेल. मात्र महाराष्ट्रातील मतदारांकडून अपेक्षा आहे. कृपा करून राजकीय व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका, असे हात जोडून आवाहन करतानाच पुढचे दिवस भीषण आहेत. किमान पुढच्या पाच वर्षांसाठी तरी देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे, असेही राज म्हणाले.

सेना फोडण्याचा प्रस्ताव होता : राज यांचा गौप्यस्फोट

राज ठाकरे हे शिवसेनेत असतानाच त्यांना पक्ष फोडण्याचा प्रस्ताव शिवसेनेतील काही नेत्यांकडून देण्यात आला होता, असा गौप्यस्फोट त्यांनी शिवाजी पार्कवर केला. मनसे सोडून राज ठाकरे हे शिवसेना (शिंदे) पक्षाचे प्रमुख होणार, या चर्चाही त्यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावल्या. राज म्हणाले, काय तर म्हणे मी शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख होणार. मला व्हायचे असते तर तेव्हाच नसतो झालो. मी शिवसेनेत असताना 32 आमदार, 6-7 खासदार माझ्या घरी आले आणि आपण एकत्र बाहेर पडू, असा प्रस्ताव त्यांनी दिला. मात्र मी तेव्हाच सांगितले होते की, मला पक्ष फोडून काहीही करायचे नाही. वाटल्यास मी स्वतःचा पक्ष काढेन, असे सांगून मी तेव्हा शिवसेनेच्या महाराष्ट्र दौर्‍यावर निघून गेलो, असे राज यांनी सांगितले.

स्वतःचा राजकीय पक्ष काढेन, पण कोणाच्या हाताखाली काम करणार नाही, ही खूणगाठ मी तेव्हाच बांधली होती. बाळासाहेबांशिवाय मी कुणाच्याही हाताखाली काम करणार नाही, ही माझी भूमिका आहे. तरी मी एकाला संधी दिली होती. मात्र त्याला कळलंच नाही, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

ठाकरे – राऊत हे जसे व्यक्तिगत टीका करतात तशी माझी टीका नरेंद्र मोदींवर नव्हती. मला सीएम बनवले नाही, माझा पक्ष फोडला, सत्तेतून मला बाहेर काढले म्हणून ठाकरे-राऊत हे खालच्या पातळीवर टीका करीत आहेत. मला भूमिका नाही पटली म्हणून मी तेव्हा विरोध केला. मला काही हवे होते म्हणून विरोध नव्हता केला. आज विरोधात बोलणारे तेव्हा खिशात राजीनामे घेऊन हिंडत होते. तेव्हा का नाही आलात सोबत? पण, त्यावेळी ते सत्तेतून मिळणारा मलिदा चाटत होते ना! आज विरोध करतायत. तुमच्या स्वार्थ, सत्ता गेली म्हणून विरोध करताय, अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

निवडणूक आयोगावर टीका

डॉक्टर्स व नर्सेस यांना निवडणूक ड्युटी लावल्याबद्दल त्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली. निवडणुकीसाठी म्हणून पालिकेच्या डॉक्टर्स, नर्सेसला बोलावले आहे. डॉक्टर मतदाराची नाडी मोजणार की नर्सेस मतदारांचे डायपर बदलणार आहे? निवडणूक आयोग आपली एक समांतर फळी का उभारत नाही? निवडणुका आल्या की हे कसले उपद्व्याप करता? नर्सेस-डॉक्टर यांनी निवडणुकांच्या कामावर जाऊ नये. तुम्हाला नोकरीवरनं कोण काढतं ते बघतो, असा इशाराही त्यांनी आयोगाला दिला.

पक्ष फोडण्याचा फार पूर्वीच प्रस्ताव : राज यांचा गौप्यस्फोट

राज ठाकरे हे शिवसेनेत असतानाच त्यांना पक्ष फोडण्याचा प्रस्ताव शिवसेनेतील काही नेत्यांकडून देण्यात आला होता, असा गौप्यस्फोट त्यांनी शिवाजी पार्कवर केला. एवढेच नव्हे तर मनसे सोडून राज ठाकरे हे शिवसेना (शिंदे) पक्षाचे प्रमुख होणार, या चर्चाही त्यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावल्या. काय तर म्हणे, मी शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख होणार. मला व्हायचे असते तर तेव्हाच नसतो झालो? मी शिवसेनेत असताना 32 आमदार, 6-7 खासदार माझ्या घरी आले आणि आपण एकत्र बाहेर पडू, असा प्रस्ताव त्यांनी दिला. मात्र मी तेव्हाच सांगितले होते की, मला पक्ष फोडून काहीही करायचे नाही. वाटल्यास मी स्वतःचा पक्ष काढेन, असे सांगून मी तेव्हा शिवसेनेच्या महाराष्ट्र दौर्‍यावर निघून गेलो, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

Back to top button