उत्तर पूर्व मुंबईत मनसेची भूमिका ठरणार निर्णायक

उत्तर पूर्व मुंबईत मनसेची भूमिका ठरणार निर्णायक

मुंबई : उत्तर पूर्व लोकसभा मतदार संघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मोठी व्होटबँक आहे. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या लोकसभा मतदार संघातील पाच विधानसभा मतदार संघांमधून मनसेने तब्बल 1 लाख 23 हजार 483 मते घेतली होती. या मतांची संख्या लक्षात घेता, उत्तर पूर्व मुंबईत मनसेची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. या मतदार संघात मनसेने उमेदवार उतरवल्यास याचा लाभ भाजपप्रणीत महायुतीला होऊ शकतो, तर महाविकास आघाडीसाठी मोठा धोका ठरू शकतो.

2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबई शहर व उपनगरातून मनसेचा एकही आमदार निवडून आला नसला, तरी मनसेला मतदान करणार्‍या मराठी माणसांची संख्या मोठी होती. येणार्‍या लोकसभा निवडणुकीत मनसे उमेदवार देणार की नाही, याबाबत अजून काही ठरलेले नाही. मात्र, उत्तर पूर्व मुंबई लोकसभेचा आढावा घेतला असता, या मतदार संघातील निवडणुकीत मनसेची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुलुंड विधानसभा मतदार संघात भाजपला मानणार्‍या मतदारांची संख्या जास्त असली, तरी या मतदार संघात मनसेने दुसर्‍या क्रमांकाची म्हणजे 29 हजार 905 मते घेतली होती. भांडुप विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाचा बालेकिल्ला असला, तरी या मतदार संघात मनसेने तब्बल 42 हजार 782 मते घेतली होती. विक्रोळी विधानसभा मतदार संघातही मनसेला 16 हजार 42 मतदारांनी कौल दिला होता. घाटकोपर पश्चिम हा पूर्वी मनसेचा बालेकिल्ला होता. या मतदार संघातून मनसेचे राम कदम निवडून गेले होते. मात्र, कदम यांनी भाजपचे कमळ हाती घेऊन निवडणूक लढवल्यामुळे मनसेला पराभवाचा सामना करावा लागला. तरीही या मतदार संघात मनसेने तब्बल 15 हजार 19 मते घेतली होती.

घाटकोपर पूर्व हा सुरुवातीपासून भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. तरीही या मतदार संघात मनसेने दुसर्‍या क्रमांकाची म्हणजेच 19 हजार 735 मते घेतली होती. याकडेही भाजप-शिवसेना महायुती व शिवसेना ठाकरे गट काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीला दुर्लक्ष करून चालणार नाही. या पाच विधानसभा मतदार संघात मनसेने 1 लाख 23 हजार 483 मते घेतली. यातील 90 टक्क्यांपेक्षा जास्त मतदार हे मराठी भाषिक होते. त्यामुळे येणार्‍या लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेने आपला उमेदवार उतरवला, तर मराठी मतांची मोठी विभागणी होऊन, याचा थेट फटका ठाकरे गटाला पर्यायाने आघाडीला बसू शकतो. मात्र, मनसेने येथे उमेदवारच दिला नाही, तर मनसेची 70 ते 80 टक्के मते आघाडीच्या बाजूने जाण्याची शक्यता आहे.

2014-2019 मध्ये भाजपचे मताधिक्य वाढले

2009 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला पराभवाचा सामना करावा लागला होता. या निवडणुकीत मनसेने 1 लाख 95 हजार म्हणजेच 29.22 टक्के मते घेतली होती. त्यामुळे भाजप-शिवसेना युतीचे मताधिक्य घटले. या निवडणुकीत भाजप उमेदवार किरीट सोमय्या यांना 2 लाख 10 हजार मते मिळाली होती. तर 2 लाख 13 हजार मते घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील विजयी झाले होते. अवघ्या 2900 मतांनी सोमय्या यांचा पराभव झाला होता. 2014 व 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र मनसेने येथून उमेदवार उतरवला नाही. त्यामुळे 2014 च्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला सुमारे 5 लाख 25 हजार मतदान झाले. तर 2019 मध्ये 5 लाख 14 हजार मतदान झाले. त्यामुळे यावेळी मनसे मैदानात उतरली नाही, तर महाविकास आघाडीसाठी फायदेशीर मानले जात आहे. अन्यथा शिवसेना-भाजप युतीला याचा फायदा होऊ शकतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news