Lok Sabha Election 2024 | ‘वंचित’मुळे उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसची कोंडी | पुढारी

Lok Sabha Election 2024 | ‘वंचित’मुळे उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसची कोंडी

गौरीशंकर घाळे

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात भाजप आणि काँग्रेसचा उमेदवाराचा तिढा कायम आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीने अबुल हसन खान यांची उमेदवारी जाहीर करत काँग्रेसची कोंडी केली आहे. खान यांच्या उमेदवारीने मतदार संघातील हक्काची मुस्लिम मते राखण्याचे आव्हान काँग्रेसपुढे आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत खान यांनी सुमारे आठ हजार मते खेचल्याने काँग्रेसचे दिग्गज नेते नसीम खान यांना चांदिवलीत पराभवाचा सामना करावा लागला. नसीम खान यांचा अवघ्या 409 मतांनी निसटता पराभव झाला. त्यावेळी वंचितच्या अबुल हसन खान यांना मिळालेली 8 हजार 876 मते काँग्रेसच्या जिव्हारी लागली.

काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ अशी उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाची ओळख आहे. अभिनेते आणि काँग्रेस नेते दिवंगत सुनील दत्त यांच्या पश्चात त्यांची कन्या प्रिया दत्त यांनी या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. मात्र, मोदी लाटेत हा मतदारसंघ भाजपकडे आला. 2014 आणि 2019 च्या लढतीत भाजपच्या पूनम महाजन इथल्या खासदार बनल्या. यंदा मात्र समीकरणे बदलली आहेत. भाजप महाजन यांची उमेदवारी टाळण्याच्या मानसिकतेत आहे. तसे स्पष्ट संकेत मिळाल्याने पूनम महाजन यांनीही मतदार संघातला वावर कमी केला आहे. पक्षाध्यक्षांचा मेळावा, महत्त्वाच्या बैठकांतील त्यांची अनुपस्थिती अधोरेखित केली जात आहे. मात्र, मतदार संघातील धार्मिक समीकरणांना छेद देत विजयाची खात्री देणारा सक्षम पर्यायी उमेदवारच सापडत नसल्याने भाजप कात्रीत अडकला आहे.

 दुसरीकडे इच्छुकांच्या मोठ्या यादीने काँग्रेसचा गोंधळ उडाला आहे. महाविकास आघाडीच्या मुंबईतील जागावाटपात उत्तर मध्यचा एकमेव मतदारसंघ काँग्रेसच्या झोळीत आला आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक काँग्रेस नेते या मतदार संघात संधी मिळेल, या आशेवर आहेत. मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड, आमदार भाई जगताप, माजी मंत्री नसीम खान यांची नावे इच्छुकांच्या यादीत आहेत. तर, दिल्लीतील काँग्रेस हायकमांडसमोर राज बब्बर आणि अभिनेत्री स्वरा भास्कर यांचीही नावे आहेत. दुसरीकडे प्रिया दत्त या जवळपास राजकीय निवृत्तीच्या अवस्थेत आहे. मागच्या निवडणुकीतही त्या फारशा सक्रिय नव्हत्या. तेव्हाही निवृत्तीची इच्छा त्यांनी बोलून दाखविली होती. तरीही पक्षाने प्रिया दत्त यांना मैदानात उतरविले होते. त्यांना महाजनांसमोर दुसर्‍यांदा पराभव पत्करावा लागला. मात्र, या लढतीत काँग्रेसच्या मतांमध्ये तब्बल 65 हजारांची वाढ पाहायला मिळाली. साडेतीन लाख मतांचा पल्ला प्रिया दत्त यांनी ओलांडला. दुसरीकडे भाजपच्या महाजनांची मते सुमारे नऊ हजारांनी घटली. प्रिया दत्त या मतदारसंघात फारशा सक्रिय नाहीत. पक्षाच्या कार्यक्रमातील त्यांची साधी हजेरीसुद्धा बातम्यांचा विषय बनते. अशा स्थितीतही 2014 च्या तुलनेत 2019 मध्ये वाढलेला मतांचा टक्का हा मतदार संघातील काँग्रेसच्या ताकदीचा परिचय देणारा आहे. यात प्रामुख्याने मुस्लिम आणि ख्रिश्चन मतांचा समावेश आहे.

वंचित बहुजन आघाडीने अबुल हसन खान यांच्या उमेदवारीचे घोषणा करत आघाडी घेतली आहे. अबुल खान यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसला आपला उमेदवार निवडताना आता अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. स्वतः खान यांनी 2019 मध्ये उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाचा घटक असणार्‍या चांदिवली विधानसभेतून निवडणूक लढविली होती. त्यात त्यांनी एकूण 8 हजार 876 मते घेतली. तर, काँग्रेसच्या नसीम खान यांना अवघ्या 409 मतांनी शिवसेनेच्या दिलीप लांडे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने 33 हजार 703 मते घेतली होती. त्यामुळे काँग्रेससमोर आपली हक्काची अल्पसंख्याक मते राखण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. महाविकास आघाडीने महाराष्ट्रात अद्याप एकही मुस्लिम उमेदवार दिला नसल्याच्या चर्चेला पाय फुटले आहेत. अद्याप एमआयएम मैदानात उतरणे बाकी आहे. त्यामुळे उत्तर मध्य मुंबईत मुस्लिम उमेदवार द्यावा, असा प्रस्ताव पुढे केला जात आहे. दुसरीकडे मतदार संघात अटीतटीचा सामना रंगणार असल्याने भाजपही सावध पवित्र्यात आहे. काँग्रेसकडून मुस्लिम उमेदवार जाहीर झाला किंवा वादग्रस्त नाव समोर आल्यास ध्रुवीकरणाचा फायदा उठविता येईल, यासाठी भाजपची यंत्रणा दबा धरून आहे. त्यासाठीच पूनम महाजनांना ताटकळत ठेवून काँग्रेसच्या उमेदवाराची प्रतीक्षा भाजप करत आहे.

 दृष्टिक्षेपात मतदारसंघ

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला, कलिना, वांद्रे पूर्व आणि वांद्रे पश्चिम या विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. त्यात विलेपार्ले येथे भाजपचे पराग अळवणी, वांद्रे पश्चिममध्ये भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, चांदिवली येथे शिवसेना शिंदे गटाचे दिलीप लांडे, कुर्ला येथे शिवसेना शिंदे गटाचे मंगेश कुडाळकर, कलिनामध्ये ठाकरे गटाचे संजय पोतनीस आमदार आहेत. वांद्रे पूर्व मतदार संघात काँग्रेसचे झिशान सिद्दीकी आमदार आहेत. विधानसभानिहाय विचार करता येथे भाजपचे दोन, शिंदे गटाचे दोन, एक शिवसेनेचा, तर एक काँग्रेसचा आमदार असे बलाबल आहे. मात्र, झिशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी अलीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. तर, झिशान सिद्दीकी योग्यवेळी काँग्रेसबाहेर पडण्याची चर्चा आहे.

बॉलीवूडवाल्यांचा मतदारसंघ

मुंबईतील कॉस्मोपॉलिटन तोंडवळ्याचा मतदारसंघ म्हणून उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघाकडे पाहिले जाते. हिंदी सिने तारे-तारकांचा राबता मतदार संघात आहे. बॉलीवूडमधील अनेक प्रसिद्ध अभिनेते, अभिनेत्री या मतदार संघात वास्तव्याला आहेत. माऊंटमेरी चर्चसारखी ऐतिहासिक धार्मिक वास्तू, चौपाटी, चित्रपट आणि मालिका चित्रीकरणासाठीचे स्टुडीओ या मतदार संघात आहेत. उच्चभ्रूंच्या बंगल्यापासून झोपडपट्टी, मध्यमवर्गीयांच्या गृहनिर्माण सोसायट्यांनी भरलेला हा मतदारसंघ आहे. हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिमांसह विविध धर्मियांची मोठी संख्या या मतदार संघात आहे.

Back to top button