

मुंबई : सांगली आणि भिवंडी लोकसभेच्या जागेचा हट्ट काँग्रेसने सोडलेला नसल्याने या दोन जागांवर मैत्रीपूर्ण लढती लढण्याच्या मनःस्थितीत काँग्रेस असल्याचे वृत्त आहे. मात्र, मुंबईतील जागांवरील हट्ट काँग्रेसने सोडला असून एक पाऊल मागे घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
सांगली आणि भिवंडी या निवडून येतील, अशा काँग्रेसच्या जागा आहेत. आणि म्हणूनच या दोन जागांसाठी काँग्रेस अतिशय आग्रही आहे. सांगलीची जागा ठाकरे गट आणि भिवंडीची जागा शरद पवार गट सोडण्यास तयार नाहीत. ही बाब राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेस श्रेष्ठींच्या कानांवर घातली आहे. पण महाआघाडीत वाद नकोत, अशी सबुरीची भूमिका घेण्यास राज्यातील नेत्यांना सांगितले आहे. तरीही सांगली आणि भिवंडी या दोन जागांवर मैत्रीपूर्ण लढती किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्यासाठी उमेदवार उतरविण्याची तयारी काँग्रेस करत आहे. दरम्यान, बुधवारी तीन एप्रिलला महाविकास आघाडीच्या नेत्यांची संयुक्त पत्रकारपरिषद होत आहे. त्यात काँग्रेस भूमिका स्पष्ट करेल, असे सांगण्यात आले.
मुंबईत एक पाऊल मागे
मुंबईतील उत्तर पश्चिम, दक्षिण मध्य मुंबई या जागांवरील दावा काँग्रेसने सोडलेला आहे. कारण मुंबईत बंडखोरी झाली तर त्याचा परिणाम मुंबईतील सहाही जागांवर होईल, असे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाला सांगितले आहे.