Lok Sabha Election 2024 : महायुती ५ तर मविआचे १३ जागांवर अडले घोडे!

Lok Sabha Election 2024 : महायुती ५ तर मविआचे १३ जागांवर अडले घोडे!
Published on
Updated on

मुंबई : नाशिक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, धाराशिव, सातारा आणि माढा या पाच जागांचा महायुतीचा तिढा कायम आहे. नाशिकमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबतच भाजपनेही दावा केला आहे तर ठाण्याच्या जागेवर भाजपने आपला दावा ठोकला आहे. धाराशिवमध्ये राष्ट्रवादी, शिंदे गटापाठोपाठ भाजपनेही दावा केला आहे. सातारा आणि माढ्याचा तिढाही जशास तसाच आहे. दुसरीकडे, शिंदे गटाने रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचे नाव जवळपास निश्चित केल्याचे सांगण्यात येत आहे.

ठाण्यामध्ये शिवसेनेचे राजन विचारे खासदार आहेत. पक्षफुटीनंतर ते उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहिले आहेत; तर कल्याणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे हे विद्यमान खासदार असल्यामुळे शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने या दोन्ही जागांसाठी आग्रह धरला आहे. तर भाजपने दोनपैकी एका जागेचा पर्याय शिवसेनेला दिला आहे. ठाणे आणि कल्याण डोंबिवली या महत्त्वाच्या महानगरपालिका या दोन्ही मतदारसंघांमध्ये आहेत. लोकसभेचे दोन्ही मतदारसंघ सोडणे म्हणजे ठाण्यातून भाजपला बाहेर काढल्यासारखेच आहे. त्यामुळे भविष्यातील गणिते ओळखून दोन्हीपैकी एका जागेवर भाजपचा दावा आहे. मात्र, या दोन्ही जागेवर शिवसेनेचेच खासदार असल्यामुळे शिवसेनेला भाजपचा पर्याय मान्य नाही.भाजपनेही ताणून धरल्यामुळे ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर होण्यास विलंब लागत आहे.

किरण सामंत यांचे नाव निश्चित

दरम्यान, शनिवारी 'वर्षा'वर झालेल्या बैठकीत सिंधुदुर्ग भाजपकडे देण्याचा निर्णय झाला होता. मात्र उदय सामंत यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरल्यानंतर या जागेवरचा दावा शिवसेनेने कायम ठेवल्याने भाजपची अडचण झाली आहे. उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचे नाव जवळपास निश्चीत झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या जागेवरही भाजपला तडजोड करणे भाग पाडण्यात शिंदे गटाला यश आल्याचे दिसून येते.

नाशिकचा तिढा कायम

नाशिकमध्ये शिवसेनेचे हेमंत गोडसे हे खासदार आहेत. त्यामुळे ही जागा आम्हालाच मिळावी, असा हट्ट शिवसेनेने धरला आहे. ही जागा आपल्यालाच मिळावी यासाठी गोडसे यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने सातारा जागेच्या बदल्यात नाशिकसाठी हट्ट धरला आहे. भाजपने सातार्‍याची जागा उदयनराजे भोसले यांना जाहीर केल्यानंतर या बदल्यात नाशिक देण्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसला दिले आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन तर भाजपचेही तीन आमदार आहेत. शिवसेनेचा या मतदारसंघात एकही आमदार नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने छगन भुजबळ यांच्यासाठी नाशिक मतदारसंघाची भाजप आणि शिवसेनेकडे मागणी केली आहे. पण ही जागा सोडायला शिवसेना तयार नाही. मात्र, सातारा सोडल्यामुळे नाशिकची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना येथून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

सातार्‍याच्या बदल्यात नाशिक?

राष्ट्रवादी काँग्रेसने सातारामधून आमदार मकरंद पाटील यांचे बंधू, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले होते. पण भाजपकडून उमेदवारी मिळण्यासाठी उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत चार दिवस तळ ठोकून उमेदवारीवर दावा सांगितला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघावरील दावा सोडला आणि नाशिकला पसंती दिली. माढामध्येही राष्ट्रवादीकडून विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव निश्चित केले होते. पण भाजपने रणजितसिंह निंबाळकर यांचे नाव घोषित केले.

भाजपचा डाव उधळून लावला

रायगड लोकसभा मतदार संघासाठीही भाजपने व्यूहरचना केली होती. त्यामुळे इतर जागांप्रमाणे रायगडचाही भाजपकडून उमेदवार जाहीर होण्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यमान खासदार सुनील तटकरे यांच्या नावाची घोषणा करून भाजपचा डाव मोडून काढला. बारामतीमध्ये शरद पवार यांच्या सुकन्या सुप्रिया सुळे यांच्या पराभवासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांनाच उमेदवारी द्यावी, असा भाजपचा आग्रह होता. त्यामुळे शिवसेनेने या जागेसाठी आग्रह धरला नाही.

धाराशिवचे नाव आज जाहीर होणार

धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी उद्धव ठाकरे गटाने येथे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. पण या जागेसाठी शिवसेना आणि भाजपचाही आग्रह आहे. या मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार विक्रम काळे यांचे नाव निश्चित केले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच भाजपचे आमदार जगजितसिंह राणा यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचे नाव पुढे आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सोमवारी याबाबत पत्रकार परिषदेत घोषणा करणार होते. पण ही पत्रकार परिषद आता मंगळवारी घेण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news