Lok Sabha Election 2024 : महायुतीचा चार-पाच जागांवर तिढा

Lok Sabha Election 2024 : महायुतीचा चार-पाच जागांवर तिढा
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महायुतीतील जागावाटपाचा तिढा चर्चेच्या अनेक फेर्‍या आणि दोन दिल्ली वार्‍यांनंतरही कायम आहे. या जागावाटपाची सद्यस्थिती सांगताना आमचे चार ते पाच जागांवर अडलेले आहे, अशी कबुली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. एक-दोन दिवसांत महायुतीतील जागावाटपाचा पेच सुटेल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. फडणवीसांच्या या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही दुजोरा दिला आहे.

महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसने 8 जागा मागितल्या असल्याची माहितीही राष्ट्रवादीकडून देण्यात आली आहे. याचाच अर्थ दोन आकडी जागांसाठी आता अजित पवार गट आग्रही नसून, पाच-सहा जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस तडजोड करू शकते.

एक जागा अडली की, तीन जागा अडतात. एक जागा यांची असेल, तर दुसरी त्यांची असते; पण फार काही अडलेय अशीही परिस्थिती नाही. एक-दोन दिवसांत जागावाटपाचा तोही तिढा सुटेल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

धाराशिवच्या जागेबाबत महायुतीच्या स्थानिक नेत्यांनाच निर्णय घेण्यास सांगितले आहे. धाराशिवबाबत आजी-माजी आमदारच ठरवत आहेत. मी, अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तुम्ही जो निर्णय करून याल, त्यावर आम्ही शिक्कामोर्तब करू, असे सांगितले आहे. त्यामुळे धाराशिवचा निर्णय स्थानिक नेतृत्वावर सोपविण्यात आला आहे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवरही टीका केली. महाविकास आघाडी असो की इंडिया आघाडी असो, यात मैत्रीपूर्ण लढत सुरू आहे. चार महिन्यांपासून ते मित्र म्हणून बसतात आणि नंतर लढाई करतात हेच चित्र दिसत आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

मनसेसोबत युतीचा अद्याप निर्णय नाही

मनसेसोबत आमच्या बैठका झाल्या आहेत. निवडणुकीसंदर्भात सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जातात. पण मनसेसोबतच्या युतीचा कोणताही निर्णय अद्यापपर्यंत झालेला नाही, असेही फडणवीसांनी स्पष्ट केले.

जागा वाटपाची घाई नाही : तटकरे

महायुतीचे जागा वाटप का केले जात नाही, असा प्रश्न विचारला असता, निवडणुका पाच टप्प्यांत असल्यामुळे आम्ही घाई करत नाही. मात्र, येत्या एक-दोन दिवसांत याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) चे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे म्हणाले. आम्ही महायुतीकडे 8 जागा मागितल्या आहेत. त्यापैकी आतापर्यंत 3 उमेदवार घोषित केले आहेत. रायगड मतदार संघातील सध्याच्या निवडणूक परिस्थितीबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची आपण भेट घेऊन सविस्तर चर्चा केली असल्याची माहितीही तटकरे यांनी दिली.

आता लक्ष नाशिक, सातार्‍यावर : तटकरे

काही जागांवर प्रत्येक घटकपक्षाने हक्क सांगितल्यामुळे काहीअंशी अडचणी होत्या. आता त्या अडचणी दूर होत आहेत. रायगड, रत्नागिरी मतदारसंघांवर भाजपने दावा सांगितला होता. मात्र, भाजपचे तेथील कार्यकर्ते आणि नेत्यांसोबत आम्ही चर्चा केली असता, तो प्रश्न सुटला आहे. आता सातारा आणि नाशिक या जागांबाबत चाचणी सुरू आहे. नाशिकमधून भुजबळ यांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा सुरू असल्याचेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news