मुंबईत एकाच जागेवर काँग्रेस नेत्यांच्या नजरा; उत्तर-मध्य मतदारसंघात भाजपने पूनम महाजनांना ताटकळत ठेवले | पुढारी

मुंबईत एकाच जागेवर काँग्रेस नेत्यांच्या नजरा; उत्तर-मध्य मतदारसंघात भाजपने पूनम महाजनांना ताटकळत ठेवले

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  महाविकास आघाडीच्या जागावाटपात मुंबईतील सहापैकी उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची एकच जागा काँग्रेसच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस चे विविध नेते या मतदारसंघासाठी प्रयत्नशील आहेत. तर, दुसरीकडे भाजपकडून विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्या उमेदवारीबाबत अद्याप कोणताच निर्णय केलेला नाही.

संबंधित बातम्या 

शिवसेना ठाकरे गटाने मुंबईतील चार जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. तर, उत्तर मुंबईत विनोद घोसाळकरांना ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे मुंबईतील काँग्रेसच्या नेत्यांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. माजी मंत्री आणि काँग्रेस नेते नसीम खान या जागेसाठी प्रयत्नशील आहेत. चांदिवली विधानसभेत अवघ्या काही मतांनी मागच्या वेळी नसीम खान यांचा पराभव झाला होता. मात्र, चांदिवलीत त्यांची पकड कायम आहे. शिवाय, मतदारसंघात मुस्लिम मतदारांचे लक्षणीय प्रमाण आहे. त्याचा फायदा नसीम खान होईल असा तर्क काढला जात आहे. वर्षा गायकवाड या मूळच्या दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील असल्या तरी त्यांच्याकडूनही उत्तर-मध्य मुंबईची चाचपणी सुरू आहे.

मात्र, गायकवाड यांचे मुंबई अध्यक्ष पद आणि चंद्रकांत हांडोरे यांच्या खासदारकीने दलित समाजाचा रोष कमी झाला आहे. त्यामुळे नसीम खान यांना मैदानात उतरवित मुस्लिम आणि दलित मतदारांची मोट बांधण्याचा प्रयत्न होऊ शकतो. याशिवाय ज्येष्ठ नेते सुरेश शेट्टी यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. याशिवाय, स्थानिक आणि मराठी चेहरा म्हणून भाई जगताप यांच्या नावाचीही चर्चा आहे. भाई जगताप हे स्थानिक असल्याने मतदारसंघाची जाण, त्यांचे स्वतःचे नेटवर्क जगताप यांची जमेची बाजू आहे. यासोबतच अभिनेते राज बब्बर यांचे नावही चर्चेत आहेत. वांद्रेकर असणारे राज बब्बर यांचे आजवरचे राजकारण उत्तर प्रदेशातच झाले. त्यामुळे उत्तर प्रदेश की महाराष्ट्र असा पेच बब्बर यांच्या नावाबाबत आहे.

एकीकडे काँग्रेस नेते जागा मिळविण्याच्या प्रयत्नात असताना माजी खासदार काँग्रेस नेत्या प्रिया दत्त मात्र अन्य पर्यायांच्या शोधात आहेत. काँग्रेसमध्ये निष्क्रिय असलेल्या दत्त या भाजपमधून प्रयत्नशील आहे. मात्र, भाजप त्यांच्या नावाबाबत फारसा उत्सुक नाही. त्यामुळे आमदार आशिष शेलार आणि आमदार अमित साटम यांच्या नावाची चर्चा आहे. येत्या एक दोन दिवसात भाजपकडून मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता आहे.

भाजपने 2019 साली महाराष्ट्रात 25 जागा लढवत 23 खासदार निवडून आणले. यंदाच्या निवडणुकांसाठी भाजपने आतापर्यंत 24 उमेदवारांची घोषणा केली आहे. यात 15 खासदारांना पुन्हा संधी दिली, तर मुंबईतील दोघांसह एकूण पाच विद्यमान खासदारांचा पत्ता कापला. या 23 विद्यमान खासदारांपैकी केवळ पूनम महाजन यांच्याबाबतच निर्णय झालेला नाही. अद्याप त्यांचा पत्ता कट झाला नाही, भाजपचा उमेदवाराचा शोध संपलेला नाही. त्यामुळे कदाचित पूनम महाजनांना संधी मिळू शकते, अशीही चर्चा आहे.

Back to top button