Lok Sabha Election 2024 | महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित | पुढारी

Lok Sabha Election 2024 | महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला गुरुवारी निश्चित झाला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजप लोकसभेच्या 48 पैकी 27 जागा लढवणार आहे. शिवसेनेच्या वाट्याला 14, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 5 जागा मिळाल्या आहेत. उर्वरित दोन जागांबाबत महायुतीत अद्याप पेच कायम आहे. त्यामुळे त्याबाबतचा निर्णय झालेला नाही. दरम्यान, महायुतीच्या बैठकीनंतर शिवसेनेने 14 पैकी 8 उमेदवारांची यादी सायंकाळी जाहीर केली. (Lok Sabha Election 2024)

महायुतीच्या यापूर्वी झालेल्या बैठकीत भाजपने 30 ते 32 जागांवर दावा केला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत ही बैठक सह्याद्री अतिथीगृहात झाली होती. भाजपने शिवसेनेला 10 ते 12 जागा आणि राष्ट्रवादीला 6 ते 8 जागा देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, गुरुवारी झालेल्या बैठकीत भाजपने एक पाऊल मागे घेत 32 ऐवजी 27 जागांवर निवडणूक लढविण्यास संमती दिली.

या बैठकीनंतर काही वेळातच शिवसेनेने आपल्या 8 उमेदवारांची यादी जाहीर केली. विशेष म्हणजे, या पहिल्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाचा समावेश नाही.

दुसरीकडे, महाविकास आघाडीचीही जागावाटप निश्चित करण्यासाठी बैठक झाली. जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित होण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 17 उमेदवार जाहीर केले होते. यातील 3 जागांवर काँग्रेसने दावा केला आहे. (Lok Sabha Election 2024)

Back to top button