मोठी बातमी! अभिनेता गोविंदाचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश | पुढारी

मोठी बातमी! अभिनेता गोविंदाचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणूकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे.  माजी खासदार आणि प्रसिद्ध अभिनेता गोविंदा अहुजा यांनी आज (दि.२८ मार्च ) शिवसेना ( एकनाथ शिंदे ) पक्षात प्रवेश केला. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. माझा १४ वर्षांचा राजकीय वनवास संपला, असे गाेविंदा यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत गोविंदा म्‍हणाले की, “एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक विकास कामे केली आहेत. म्हणूनच आजची मुंबई ही सुंदर मुंबई दिसत आहे. मला चित्रपट सृष्टीसाठी काम करायचं आहे. गेली अनेक वर्षे मी राजकारणापासून लांब होतो; पण आता मी पुन्हा कमबॅक केलं आहे. मी राजकारणात प्रामाणिकपणे काम करेन.”

मी राजकारणात परत आलो आहे. शिंदे यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली आहे. पक्ष जी जबाबदारी देईल मी पार पाडणार असल्याचेही गाेविंदा यांनी स्‍पष्‍ट केले.

गोविंदा यांची राजकीय कारकिर्द

 गोविंदा यांनी २००४ लाेकसभा निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढवली. यावेळी ते 50,000 मतांच्या फरकाने विजयी झाले. तथापि, नंतर त्याने आपल्या अभिनय कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कार्यकाळ पूर्ण करण्यापूर्वी आपल्‍या खासदारकीचा राजीनामा दिला हाेता.

Back to top button