मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीतील जागावाटपाचा वाद 26 मार्चपर्यंत न मिटल्यास आम्हालाही भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा देणारे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे मंगळवारी (दि. 26) आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. अकोला येथे पत्रकार परिषद घेऊन आंबेडकर महाविकास आघाडीतून बाहेर पडणार की तिसर्या आघाडीत सहभागी होण्याबाबत घोषणा करणार, याकडे राजकीय वर्तुळासह अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडीच्या जागावाटपात समाधानकारक जागा न मिळाल्याने प्रकाश आंबेडकर हे नाराज आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना (ठाकरे) यांच्यातील वाद मिटत नाही, तर मग आघाडीत कशाला जायचे, असा प्रश्न उपस्थित करत 26 मार्चपर्यंत त्यांच्यातील जागावाटपाचा वाद संपण्याची आम्ही वाट पाहणार आहोत. त्यानंतर आम्ही आमची भूमिका मांडणार, असा अल्टिमेटम आंबेडकर यांनी दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीला दिला होता. दरम्यान, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी प्रकाश आंबेडकर यांची शनिवारी मुंबईत भेट घेऊन त्यांना तिसर्या आघाडीचा प्रस्ताव दिला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वंचित महाविकास आघाडीकडून नव्या प्रस्तावाची वाट पाहणार आहे. उद्या, मंगळवारी सकाळपर्यंत आघाडीच्या नेत्यांकडून निरोपाची वाट पाहिली जाणार आहे. त्यानंतर दुपारी अकोला येथे प्रकाश आंबेडकर हे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.