मुंबई; पुढारी वृत्तसेवा : जगात गेल्या दहा वर्षात 2023 हे वर्ष सर्वाधिक उष्ण वर्ष असल्याचे जागतिक संघटनेच्या हवामान विभागासंदर्भातील संघटनेच्या अहवालातून पुढे आले आहे. युनोकडून उष्म्याच्या लाटांमुळे जगभरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 2024 सालही सर्वाधिक उष्ण ठरणार असल्याचेही युनोने म्हटले आहे.
संबंधित बातम्या
वर्ल्ड मेटरॉलॉजिकल ऑर्गनायजेशनच्या अहवालात म्हटले आहे की, 2023 साली गेल्या दहा वर्षातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. महासागरात उष्म्याच्या लाटांनी हाहाकार उडवून दिला असून अनेक ठिकाणी उष्म्यामुळे हिमनग वितळले असल्याचे या अहवालात म्हटले आहे. जमिन, पाणी, समुद्र, हरितगृहातील वायू आदींचे तापमान मर्यादेहून अधिक वाढले आहे. प्रशांत महासागरातील तापमानाचा अल निनोवर प्रभाव होतो. या महासागराच्या तापमानातील वाढ झाल्याने चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
युनोचे प्रमुख अँटोनिओ गुटरेस यांनी वाढत्या उष्म्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. उष्णतेच्या लाटांचा पृथ्वीसमोर धोका आवासून उभा आहे. जिवाष्म इंधनाच्या प्रदूषणामुळे वातावरणात चटक्यांची अनुभूती येत असल्याचे त्यांनी नमूद केले. 2015 साली पॅरिस येथील हवामान बदलासंदर्भातील परिषदेत तापमानाची मर्यादा 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत नियंत्रित ठेवण्याबाबत करार करण्यात आला होता. सद्यस्थितीत भुपृष्ठावरील तापमानाची सरासरी 1.45 अंश सेल्सिअसपर्यंत वाढली आहे. त्यामुळे तापमानवाढीबाबत जगभर इशारा देण्यात आल्याची माहिती गुटरेस यांनी दिली आहे.
2023 सालच्या विक्रमी तापमानवाढीमुळे अंटार्टिका खंडातील बर्फ मोठ्या प्रमाणात वितळला आहे. महासागरावरील तापमानात अभुतपूर्व वाढ झाली आहे. यामुळे जैवविविधतेला हानी पोहचून अन्नसुरक्षेची समस्या उद्भवण्याची भीती युनोकडून व्यक्त करण्यात आली आहे.