सांगलीत ठाकरे सेनेचाच उमेदवार : संजय राऊत | पुढारी

सांगलीत ठाकरे सेनेचाच उमेदवार : संजय राऊत

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : सांगली लोकसभा मतदार संघातून शिवसेनेतर्फे (उबाठा) डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील लढतील, असे शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत पुन्हा सांगितले. ही भूमिका ते पुन्हा, पुन्हा ठामपणे जाहीर करीत आहेत. जागावाटपाची चर्चा पूर्ण झाली असून, दोन दिवसांत त्याची घोषणा होईल, असेही ते म्हणाले.

कोल्हापूर हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे. मात्र, कोल्हापूरमधून शाहू महाराज निवडणूक लढवत असल्याने महाविकास आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ काँग्रेसला दिला आहे. त्याबदल्यात शिवसेनेने सांगलीची जागा घेतली आहे, असे खासदार राऊत यांनी सांगितले. महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात शनिवारी नेहरू सेंटरमध्ये बैठक झाली. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीत आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांचे नेते उपस्थित होते.

सांगलीच्या जागेवरून काँग्रेस व ठाकरे गटात सुरू असलेल्या वादासंदर्भात राऊत म्हणाले, रामटेकची जागा आणि कोल्हापूरची जागा काँग्रेसला दिली आहे. कोल्हापूरच्या जागेच्या बदल्यात सांगलीची जागा शिवसेनेने घेतली आहे. उद्धव ठाकरे यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित केली आहे. त्यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे जाणार आहेत.

राहुल गांधी भावी पंतप्रधान

राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेसंदर्भात विचारले असता राऊत म्हणाले, राहुल गांधी देशातले लोकप्रिय नेते आहेत. राहुल गांधींकडे देश भावी पंतप्रधान म्हणून पाहतो आहे. पंतप्रधान म्हणून राहुल गांधींना पसंती आहे. लोकांची ती भूमिका आहे. राहुल गांधी परखडपणे भूमिका मांडतात. ते झुकत नाहीत, हुकूमशाहीपुढे नमत नाहीत. त्यांचा हा बाणा देशातल्या लोकांना आवडतो.

Back to top button