Lok Sabha Election 2024 : भाजपला सत्तेतून तडीपार करणार; उद्धव ठाकरे यांचा इशारा

Lok Sabha Election 2024 : भाजपला सत्तेतून तडीपार करणार; उद्धव ठाकरे यांचा इशारा
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : भाजप हा फुगा आहे. त्यात हवा भरण्याचे काम आम्ही केले. पण त्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. या हुकूमशहाच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी आम्ही एकत्र आलो असून त्यांना सत्तेतून तडीपार केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी शिवाजी पार्कवरील जाहीर सभेत दिला. (Lok Sabha Election 2024)

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाच्या सभेत इंडिया आघाडीने प्रचाराचे रणशिंग फुंकले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी डझनभर नेत्यांच्या भाषणात तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या भाषणाने रंगत आणली. देशाच्या विविध राज्यांतील नेत्यांनी मोदी सरकार आणि ईव्हीएम विरोधात हल्लाबोल केला. भाजपच्या सत्तेच्या पोपटाचा जीव ईव्हीएम मशिनमध्ये अडकला आहे. इंडिया आघाडी सत्तेत आल्यावर ईव्हीएम हटविण्याची घोषणाही अनेक नेत्यांनी केली. मात्र, या सर्व नेत्यांमध्ये एम. के. स्टॅलिन आणि राजद नेते तेजस्वी यादव यांच्या भाषणांना उपस्थिताकडून मोठी दाद मिळाली. उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका करताना भाजप 400 पारचा नारा देत आहे. 400 म्हणजे काय फर्निचरचे दुकान आहे का, असा सवाल त्यांनी केला.

इंडिया आघाडी ही मोदी यांच्या हुकूमशाही राजवटीच्या विरोधात आहे. तुम्हाला खुर्ची हवी आहे, पण ही जनता तुमची राजवट उलथवून टाकेल. मोदींना घटना बदलण्यासाठी 400 पार हवे आहेत. रशियात पुतीन यांनी विरोधक संपविले आहेत. हीच स्थिती भारतात आहे. देशाची ओळख एक व्यक्ती असता कामा नये. देशाला एक मजबूत सरकार देण्यासाठी इंडिया आघाडीला साथ द्या. आता एकच नारा 'अब की बार, भाजप तडीपार', असा इशारा उद्धव यांनी दिला.

इंडिया आघाडीचे सरकार येईल तेव्हा आम्ही ईव्हीएम मशिनला हद्दपार करू, अशी ग्वाही फारुख अब्दुल्ला यांनी यावेळी दिली.
या निवडणुकीत विचारपूर्वक मतदान केले नाही तर जे हाल आमचे होताहेत, तेच तुमचेही होतील, अशी भीती मेहबुबा मुफ्ती यांनी बोलून दाखवली. आपचे सौरभ भारद्वाज म्हणाले, ईव्हीएमच्या गैरवापरातून सात ते दहा टक्के मते वाढविली जातात. हा प्रकार संपवण्यासाठी अधिकच्या वीस टक्के लोकांना बाहेर पडून मतदान करावे लागेल. झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, भाकपचे दिबांकर भट्टाचार्य, केरळचे सादिक अली थंगल आदींचीही भाषणे झाली.

'व्हाईट कॉलर' भ्रष्टाचार : एम. के. स्टॅलिन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांत फक्त परदेश दौरे आणि फेक प्रोपोगंडा चालविणे ही दोनच कामे केल्याची टीका तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी केली. इंडिया आघाडीला भ्रष्टाचारी म्हणणारी भाजप किती भ्रष्टाचारी आहे हे इलेक्टोरल बाँडच्या निमित्ताने उघड झाले आहे. इलेक्टोरल बाँड हा खूप 'व्हाईट कॉलर' भ्रष्टाचार असल्याची टीका स्टॅलिन यांनी केली.

एकत्र असो वा स्वतंत्र, लढले पाहिजे : आंबेडकर

भारत जोडो यात्रेच्या समारोपाच्या सभेत इंडिया आघाडीच्या देशभरातील नेत्यांनी केंद्र सरकारविरोधात सूर मिसळले. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही मोदींविरोधात तोफ डागली. मात्र, त्यासाठी एकत्र असो वा स्वतंत्र, पण लढले पाहिजे, असे सांगत इंडिया आघाडीलाच गुगली टाकली. इलेक्टोरल बाँडचा विषय महत्वाचा आहे. गृहमंत्री अमित शहा हे काळा पैसा दूर केल्याचे सांगत आहेत. फ्युचर गेमिंग कंपनीने 1 हजार 360 कोटींचे बाँड घेतले आहेत. मग, यावर आपण अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न करणार आहोत का?, असे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news