

मुंबई : पुढारी ऑनलाईन : corona new variant : दक्षिण आफ्रिकेत धुमाकूळ घालणार्या 'ओमिक्रॉन' या नव्या कोरोना विषाणूचे संकट जगावर घोंघावू लागताच राज्य शासन सतर्क झाले आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या प्रमुखांना सुचना दिल्या आहेत. कोरोनाबाबत केंद्राकडून येणाऱ्या आदेशाची वाट न पाहता कामाला लागण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
बैठकीमध्ये मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा. केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा. लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील. विमानतळांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोर लक्ष देण्याचे देखील निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी झालेल्या बैठकीत सुचना केल्या आहेत.
लसीकरण अत्यल्प असलेल्या देशांमध्येच 'ओमिक्रॉन' विषाणूचे थैमान सुरू झाले आहे, हे लक्षात घेऊन राज्य सरकारने शनिवारी अनेक कडक नियम जारी केले. लोकांनी लस घ्यावी हा हेतू या नियमांमागे असून, लस न घेणार्या लोकांच्या दळणवळणावर या नियमांनी निर्बंध आणले आहेत.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, 1 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय यापूर्वी जाहीर करण्यात आला आहे. मात्र, शाळा सुरू करायच्या की तूर्त बंदच ठेवायच्या, याचा निर्णय या बैठकीत होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: ही बैठक ऑनलाईन घेणार असून, प्रशासनातील सर्व प्रमुख आणि आरोग्य खात्याचे अधिकारी या बैठकीस उपस्थित असतील.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सूचनेनुसार नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सर्व जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त तसेच
नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांची दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेतली. या बैठकीत मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी महापालिकेने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. मुंबई विमानतळावर विदेशातून येणार्या प्रवाशांना विलगीकरण सक्तीचे करण्यात येणार असून, कोणत्याही परिस्थितीत त्यांना घरी विलगीकरणात राहता येणार नाही.
'ओमिक्रॉन'चा (omicron variant) रुग्ण आढळलाच, तर कोरोना उपचार केंद्रांमध्ये अशा रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येईल. मुंबईत आजघडीला एकही इमारत सील नाही. कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणार्या मुंबईत 'ओमिक्रॉन'चे संकट येऊ नये आणि आलेच, तर ते वाढू नये म्हणून 'ओमिक्रॉन'चा एक जरी रुग्ण आढळला तरी संपूर्ण इमारत सील केली जाणार असल्याचे काकाणी म्हणाले.
प्रवाशांची यादी पालिकेकडे मुंबईत हा नवा विषाणू विमानतळावरूनच येऊ शकतो, हे स्पष्ट असल्याने अतिधोकादायक 14 देशांतून येणार्या प्रवाशांची यादी विमानतळांकडून नियमित घेण्याच्या सूचना नगरविकासमंत्र्यांनी या बैठकीत दिल्या. 'ओमिक्रॉन'चे रुग्ण सापडलेल्या देशांमधून आलेल्या प्रवाशांची माहितीही सर्व महापालिकांनी आपल्याकडे ठेवावी, असे ते म्हणाले.
दवाखाने पुन्हा सज्ज मुंबई महापालिकेची वैद्यकीय सेवासुविधा पुन्हा सज्ज ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
नव्या कोरोना व्हेरियंटचा मुंबई शहरात संसर्ग पसरण्याची जास्त शक्यता असल्यामुळे विमानतळावर आरोग्य विभागाच्या डॉक्टर व अन्य वैद्यकीय कर्मचार्यांची टीम तैनात करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
महाराष्ट्र राज्यात प्रवास करताना कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्थानावरून राज्यात येणार्या सर्व प्रवाशांना केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्त्वे लागू राहतील. राज्यात येणार्या सर्व देशांतर्गत प्रवाशांचे एक तर यात यापुढे व्याख्या केल्यानुसार संपूर्ण लसीकरण केले जाईल किंवा 72 तासांसाठी वैध असलेले आरटी-पीसीआर चाचणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.