Lok Sabha Elections : कोल्हापूर, सांगलीसह तीन जागा काँग्रेसला | पुढारी

Lok Sabha Elections : कोल्हापूर, सांगलीसह तीन जागा काँग्रेसला

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यात महाविकास आघाडीची जागावाटपाबाबत चर्चा सुरू असतानाच शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर शिवसेनेने कोल्हापूर, सांगली, भिवंडी हे तीन मतदारसंघ काँग्रेससाठी सोडण्यास शुक्रवारी संमती दर्शवली. या बदल्यात शिवसेनेला जालना लोकसभा मतदारसंघ देण्यात आला आहे. यामुळे शिवसेना-काँग्रेस यांच्यातील जागावाटपाचा तिढा काही प्रमाणात सुटला आहे. (Lok Sabha Elections)

भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त राहुल गांधी सध्या महाराष्ट्रात आहेत. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी नाशिकमध्ये त्यांची भेट घेऊन जागावाटपावर चर्चा केली होती. यावेळी राऊत यांच्या माध्यमातून गांधी यांनी ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. या चर्चेत कोल्हापूर, सांगली व भिवंडी या जागा काँग्रेससाठी सोडण्यास शिवसेना तयार झाली. सांगलीत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी निश्चित आहे. भिवंडीत काँग्रेसचे नीलेश सांबरे हे उमेदवार असतील. भाजप-शिवसेना युतीत सांगली व भिवंडी या जागा भाजप लढवत होता, तर शिवसेनेच्या वाट्याला कोल्हापूरची जागा आली होती. दरम्यान, भाजपने लढवलेल्या जागा आपल्याला मिळाव्यात, असा शिवसेनेचा आग्रह होता. मात्र, गांधी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर ठाकरेंनी भिवंडी व सांगलीची जागा काँग्रेसला सोडण्यास संमती दर्शवली. तसेच कोल्हापूर येथून छत्रपती शाहू महाराज हे काँग्रेसच्या तिकिटावर लढण्यास इच्छुक असल्याने ही जागाही काँग्रेससाठी सोडण्यास शिवसेना तयार झाली आहे. (Lok Sabha Elections)

जालना शिवसेनेला; लाखे-पाटील उमेदवार

जालना मतदारसंघात नेहमीच काँग्रेसने लढत दिली आहे. 2014 व 2019 या दोन्ही निवडणुकांत काँग्रेस उमेदवार विलास औताडे यांनी साडेतीन लाखांहून अधिक मतेही घेतली आहेत. युतीत ही जागा नेहमीच भाजपने लढवली आहे. त्यामुळे आपली ही जागा काँग्रेसने शिवसेनेला देऊ केली. या जागेवर सुरुवातीला उभे राहण्याचा प्रस्ताव विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना देण्यात आला होता. मात्र, त्यांनी नकार दिल्याने पक्षाकडे प्रभावी उमेदवार नसल्याची अडचण ठाकरेंनी राहुल गांधी यांना सांगितली. त्यावर काँग्रेसच्याच नेत्याला तुमच्याकडे पाठवितो, असे सांगून राहुल यांनी जालनातील मराठा समाजातील प्रभावी नेते व काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस संजय लाखे-पाटील यांचे नाव सुचविले. त्याला ठाकरेंनी संमती दिल्यानंतर राहुल यांच्याकडून लाखे-पाटील यांना शिवसेना प्रवेशाच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार लाखे-पाटील यांनी शुक्रवारी माजी खासदार चंद्रकांत खैरे व अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. (Lok Sabha Elections)

Back to top button