अमोल कीर्तिकर यांच्या उमेदवारीने ‘मविआ’त वाद | पुढारी

अमोल कीर्तिकर यांच्या उमेदवारीने ‘मविआ’त वाद

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  मुंबई उत्तर-पश्चिम (वायव्य) लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदार गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर केल्याचे पडसाद महाविकास आघाडीत उमटण्यास सुरुवात झाली आहे. कीर्तिकर यांच्या उमेदवारीवर काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी आक्षेप घेतला असून महाविकास आघाडीचे जागा वाटप ठरले नसताना अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर केलीच कशी? असा सवाल केला आहे.

संबंधित बातम्या 

कोविड काळातील खिचडी घोटाळ्याप्रकरणी त्यांची चौकशी सुरू असताना शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांचे काम करतील का? अशी शंकाही निरुपम यांनी उपस्थित केली. शरद पवार यांनी बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर जुहू येथील कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून अमोल कीर्तिकर यांच्या नावाची घोषणा केली.

मुंबईतील सहापैकी महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याची घोषणा झालेली नसताना ठाकरे यांनी कीर्तिकर यांची उमेदवारी जाहीर केली. अमोल कीर्तिकर हे आपले लोकसभेचे उमेदवार आहेत. त्यांना जिंकून द्यायचे आहे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले. त्यावर या मतदारसंघातील काँग्रेसचे दावेदार संजय निरुपम यांनी आक्षेप घेतला आहे.

निरुपम यांनी ट्विट करत अमोल कीर्तिकर यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. महाविकास आघाडीत जागावाटपावर अंतिम निर्णय झाला नसताना अशी घोषणा करणे चुकीचे आहे. महाविकास आघाडीत जागावाटपासंदर्भात चर्चा सुरू आहे. आठ-नऊ जागांचा जो तिढा आहे, त्यात उत्तर-पश्चिम मुंबईचा समावेश आहे. त्यावर निर्णय झालेला नसताना ठाकरे गट अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी कशी जाहीर करू शकतो, असे निरुपम यांनी म्हटले आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांना 5 लाख 70 हजार 63 मते मिळाली होती, तर काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांना 3 लाख 9 हजार 735 मते मिळाली होती. यावेळी महाविकास आघाडीत जागावाटपात काँग्रेसने हा मतदारसंघ मागितला होता. मात्र आता तो शिवसेनेच्या वाट्याला गेल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

Back to top button